अहमदनगर बातम्या

कोपरगाव : दोन लाखांचा गुटखा पकडला : एकाला अटक, एक पसार

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : कोपरगाव येथील कोळपेवाडी- हनुमाननगर रस्त्यावर येथील तालुका पोलिसांनी २ लाख १९ हजारांचा गुटखा व चारचाकी कार ताब्यात घेऊन नुकतीच एकाला अटक केली.

पोलिसांनी काल मंगळवारी (दि.२०) आरोपीला येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्पाक मेहबूब मनियार (वय ३०, रा. १०५ हनुमाननगर) हा मारुती सुझुकी व्हॅगनरमधून (क्रमांक एमएच ०१ वायए ०३४०) गुटखा नेत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक कोळी यांना मिळाली होती.

त्यावरून पोलिसांनी पाळत ठेवली असता, सोमवारी (दि.१९) १० वाजेच्या सुमारास कोळपवाडी ते हनुमानगनर रस्त्यावर जात असताना, पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्या कारची तपासणी केली असता,

त्यात वसीम चोपदार (रा. दत्तनगर) कोपरगाव याच्या मालकीचा हिरा गुटखा व जा, असा २ लाख १९ हजार रुपयांचा गुटखा, दोन लाखांची कार, असा एकूण चार लाख १९ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदिप कोळी, उपनिरीक्षक समाधान भटवाल, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश कुसारे,

गजानन वांडेकर, सुरेश गागरे, पोलीस नाईक विलास कोकाटे, अविनाश तमनर, पोलीस शिपाई अंबादास वाघ, अनिश शेख यांच्या पथकाने केली.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अविनाश तमनर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका पोलीस ठाण्यात अश्पाक मणियार व वसीम चोपदार या दोघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका आरोपीला अटक करण्यात आलेली असून एक दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे.

तर दुसरा आरोपी वसीम चोपदार हा फरार असल्याची माहिती तपास अधिकारी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश कुसारे यांनी दिली.

तालुका पोलीस स्टेशन हद्दीत महाराष्ट्रात प्रतिबंधित केलेला गुटखा जर्दा बाळगणारे इसमांविरुध्द कडक कारवाई करणार असल्याचे पोलीस निरीक्षक संदिप कोळी यांनी सांगितले.

Ahmednagarlive24 Office