कोपरगावचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश ! नागरिकांना मिळणार ह्या सेवा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : राज्यात ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता; मात्र दुष्काळसदृश परिस्थिती असतानादेखील कोपरगाव मतदारसंघ यादीतून वगळण्यात आला होता. त्यामुळे आमदार आशुतोष काळे यांनी मतदारसंघाचा यादीत समावेश करावा,

अशी मागणी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेऊन मतदारसंघाचा यादीत समावेश केल्याची माहिती आमदार काळे यांनी दिली आहे.

पर्जन्यछायेखाली येत असलेल्या मतदारसंघात दरवर्षी पेक्षा यावर्षी अतिशय कमी पर्जन्यमान झाले आहे. सलग दीड महिना पावसाचा खंड पडल्यामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

त्यामुळे भूजल पातळी खालावली आहे. हिवाळा नुकताच सुरु झाला असतांनाच पाण्याचे स्त्रोत आटू लागले आहेत. त्यामुळे भविष्यात किती बिकट परिस्थिती असू शकते याचा अंदाज येत आहे.

त्यामुळे मतदारसंघात दुष्काळ जाहीर करण्यात येऊन त्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दुष्काळाच्या सुविधा मिळतील, असा अंदाज होता; परंतु कोपरगाव तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या शेजारील येवला व सिन्नर तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला होता; मात्र दुष्काळसदृश परिस्थिती असूनदेखील दुष्काळजाहीर करण्यात आला नव्हता.

आ. काळे यांनी मांडलेल्या कोपरगाव मतदारसंघातील दुष्काळी परिस्थितीचा विचार करून गुरुवार (दि. ९) रोजी वॉररुममध्ये झालेल्या मंत्रीमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीत कोपरगाव तालुक्यातील कोपरगाव, रवंदे, सुरेगाव, दहेगाव बोलका, पोहेगाव व पुणतांबा या मंडलामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.

त्यामुळे मतदारसंघातील नागरिकांना जमीन महसुलात सूट, पिक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्ज वसुलीत स्थगिती, कृषी पंपाच्या वीज बिलात ३३.५ टक्के सूट, शाळा- महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी,

आवश्यक त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे टँकर्स, शेतकऱ्यांची शेती पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे आदी सोयी सवलती मिळणार आहेत.