Kopargaon News : कोपरगावात सकल हिंदू समाजाचा मोर्चा तेढ निर्माण करणारे तडीपार करण्याची मागणी; हाणामारीचे उमटले पडसाद

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

समाजात तेढ निर्माण करणाऱ्यावर तडीपारची कारवाई करण्याची मागणी येथील सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. काल मंगळवारी (दि.३०) सकाळी मोर्चा काढुन याबाबत तहसीलदार व शहर पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

प्रजासत्ताक दिनी लहान मुलांच्या भांडणावरून झालेल्या हाणामारीचे तीव्र पडसाद कोपरगावात उमटले. शहरातील गांधीनगर भागातील त्या भागातील अनेक घरावर रात्री-अपरात्री दगडफेक करून दहशत निर्माण करणे, प्रतिष्ठीत डॉक्टरावर हल्ला करून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान करणे, जमाव नेऊन पोलिसांवर दबाव तंत्राचा वापर करणे, रस्त्यावर मोकळ्या जागेत अतिक्रमण करणे व रहदारीस इतरांना त्रास होईल,

अशा प्रकारची वर्तणूक करणे व गुंडगिरी करून दंगल सदृश परिस्थिती निर्माण करण्यासाठी समाज माध्यमांवर दोन समाजात दंगल होईल, असे आक्षेपार्ह भाषण करून समाजात जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर व हिंदू समाजाविरूद्ध भडकाऊ भाषण करणाऱ्याला तडीपार करावे, अशी मागणी सकल हिंदू समाजातर्फे करण्यात आली.

सदर मागणीचे निवेदन नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे, डीवायएसपी संदीप मिटके, मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना काल मंगळवारी (दि.३०) दिले. सदर निवेदनात म्हटले आहे की, समाजात तेढ निर्माण करणे, त्यातून दंगली घडवणे, हीच विकृत मानसिकता यामागे आहे.

ही व्यक्ती उघड झाली असून सदर व्यक्तीचे पोलीस स्टेशनचे आधीचे सर्व रेकॉर्ड तपासून राहिलेल्या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून अशा समाजकंटकास तत्काळ तडीपार करावे, अन्यथा येत्या काही दिवसात बेमुदत कोपरगाव बंद पुकारावे लागेल.

त्यामुळे होणऱ्या कायदा व सुव्यवस्थेची जवाबदारी सर्वस्वी तहसीलदार, तहसील कार्यालय, कोपरगाव पोलीस स्टेशन, नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्यावर राहील, याची नोंद घ्यावी, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शंकर बागेत खेळण्यावरून लहान मुलांमध्ये झालेल्या भांडणातून शहरातील गांधीनगर येथील आचारी हॉस्पिटल येथे रविवारी (ता. २८) सायंकाळी पावणेसहा वाजता दोन गटांमध्ये हाणामारीची घटना घडली होती. लहान मुलांवरून झालेल्या हाणामारीच्या अनुषंगाने जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सदर व्यक्तीने केला आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी शहरातून निघालेल्या या मोर्चाने माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, दत्ता पुंडे, विमल पुंडे, श्रीरामपूरचे सागर बेग, कलविंदरसिंग दरियाल, संतोष गंगवाल, अमित जैन, सुशात खैरे, दत्ता काले, योगेश वाणी, गणेश शिंदे आदींच्या शिष्टमंडळाने प्रशासनाला निवेदन दिले. यावेळी शेकडो समाज बांधव सहभागी झाले होते.