अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- कोपरगाव नगरपालिकेच्या येसगाव येथील पाच नंबर साठवण तलावाचे काम चार महिन्यांत पूर्ण झाले पाहिजे, प्रसंगी खोदकाम व माती वाहतुकीसाठी वाढीव साधनसामुग्री लावावी, अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी दिल्या.
नगरपालिकेकडे पैसे नसल्याने समृध्दी महामार्गाच्या ठेकेदाराच्या मदतीने तलावाचे खोदकाम केले जात आहे. आढावा घेण्यासाठी काळे यांनी सोमवारी सकाळी पालिकेचे अधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत येसगाव येथे भेट दिली. उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात तलावाचे काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या साधनसामुग्रीचा वापर करण्याच्या सूचना त्यांनी गायत्री कन्स्ट्रक्शनचे वरिष्ठ अभियंता सुमेध वैद्य यांना दिल्या.
माती वाहतुकीसाठी येणाऱ्या तांत्रिक अडचणी अभियंता वैद्य यांनी निदर्शनास आणून दिल्या. त्यावर काळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना मदत करण्यास सांगितले. ते म्हणाले, पाच वर्षांपासून तलाव रखडला होता. त्याचा पाठपुरावा जिल्हाधिकाऱ्यांकडे करून पावसाळ्याअगोदर हे काम पूर्ण करण्याची विनंती केली.
तलावाच्या खोदकामाबरोबरच काँक्रिटीकरण पूर्ण करण्याच्या सूचना मुख्याधिकाऱ्यांना केल्या. पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटण्यासाठी तलाव वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे. या कामाचा दैनंदिन तपशील काळे यांनी अधिकाऱ्यांकडून मागवला आहे. पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे म्हणाले, या तलावाचे काम व काँक्रिटीकरणाचा आराखडा तयार करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना बोलवण्यात आले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे प्रस्ताव पाठवून त्या आराखड्यानुसार अपेक्षित निधीसाठी पाठपुरावा सुरू आहे.