अहमदनगर बातम्या

कुकडी साखर कारखान्याला वैभवशाली करणार – राहुल जगताप

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : कुकडी साखर कारखान्याने प्रत्येक वर्षी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा जादा भाव देण्याचे काम केले आहे. वार्षिक अहवालात दिसत असलेला तोटा पुढील अहवाल सालात कमी करुन कुकडी साखर कारखान्याला वैभवशाली करणार असल्याची ग्वाही देत कर्मचाऱ्यांना बोनस देऊन तर दुसरा हप्ता देऊन सभासदांची दिवाळी गोड करणार असल्याची ग्वाही कारखान्याचे अध्यक्ष राहुल जगताप यांनी दिली.

कर्मयोगी कुंडलिकराव जगताप कुकडी सहकारी साखर कारखान्याची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी कारखान्याचे अध्यक्ष राहुल जगताप यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते.

यावेळी बीआएसचे नेते घनश्याम शेलार म्हणाले की, ऊस तोडणीबाबत संचालक मंडळाने हस्तक्षेप करू नये पूर्ण अधिकार हे शेतकी अधिकाऱ्यांना दिले पाहिजे. त्यातून चांगल्या प्रतीचा ऊस कारखान्याला येईल. कारखान्याच्या जवळून ऊस बाहेरच्या कारखान्याला नेला जातो हे कारखान्याचे अपयश नाही का? असा सवाल उपस्थित केला. इथेनॉल, डिस्टलरी निर्मिती सुरू केली पाहिजे आणि को-जन प्रकल्प चांगल्या प्रकारे चालवण्याचा सल्ला यावेळी दिला.

जि.प. सदस्य दिनकर पंधरकर म्हणाले की, इतर कारखान्याच्या तुलनेत बाजारभावाची स्पर्धा करावी. उसाचे जास्तीत जास्त गाळप कसे करता येईल आणि त्यातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव कसा देता येईल यासाठी संचालक मंडळाने योग्य नियोजन केले पाहिजे.

अनाठायी खर्चाला आळा घालून काटकसरीने कारभार करावा. बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे म्हणाले, जगताप परिवाराने कुकडी साखर कारखान्याच्या माध्यमातून वंचित भागाच्या विकासाला दिशा देण्याचे काम केले.

अहवाल वाचन कारखान्याचे उपाध्यक्ष विवेक पवार व प्रभारी कार्यकारी संचालक अनिल भगत यांनी तर सुत्रसंचलन मोहनराव आढाव यांनी तर आभार जालिंदर निंभोरे यांनी मानले.

सहकार टिकवण्यासाठी खाजगी प्रॉपर्टीवर कर्ज

सहकार टिकवण्यासाठी खाजगी प्रॉपर्टीवर कर्ज काढून कारखान्याला वापरले आहे. ऊस तोडणी मजुरांना १० कोटीची अगाऊ रक्कम दिल्याने कारखाना वेळेवर सुरु करणार असून, सर्वच साखर कारखान्यांना बाहेरचा ऊस आणावा लागत आहे.

कुकडीने गेल्या वर्षी तालुक्यातील ३ लाख मे टन ऊसाचे गाळप केले. लवकरच कारखाना कार्यस्थळावर संस्थापक स्व. कुंडलिक तात्यांचे स्मारक उभे करणार असल्याचे अध्यक्ष जगताप यांनी सांगितले

Ahmednagarlive24 Office