Ahmednagar News : चारा-पाण्याअभावी पशुधनावर संकट ! जनावरांच्या किमती घटल्या, करावी लागतेय बेभाव विक्री

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : यंदा अत्यल्प पाऊस अहमदनगर जिल्ह्यात झाला. त्यामुळे आता उन्हाळ्यात पाणी पुरणार नाही असे चित्र आहे. कमी पाण्यामुळे अनेक ठिकाणी चारा व पाणीटंचाई निर्माण झालीये.

शेवगाव तालुक्यातही दुष्काळाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत. तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो आहे.

अशा परिस्थितीत नाईलाजाने शेतकरी व पशुपालकांना चारा-पाण्याअभावी गोठ्यातील जनावरे बेभाव विकून व्यापाऱ्यांच्या दावणीला पाठवावी लागत आहेत. असे चित्र कमी अधिक सर्वच तालुक्यांत दिसत आहे.

शेवगाव तालुक्यातील बोधेगावचा बैल बाजार राज्यात प्रसिद्ध आहे. येथील बाजार समितीच्या आवारात दर गुरुवारी बैलांसह गायी, म्हशी, शेळ्या मेंढ्या आदी जनावरांचा बाजार भरतो. या बाजारात जनावरांच्या खरेदी- विक्रीतून कोट्यवधींची उलाढाल होत असते.

परंतु सध्या पावसाअभावी सध्या सगळीकडेच दुष्काळाचे सावट पसरले आहे. चारा व पाणीटंचाईने कहर केला आहे. जनावरे चाऱ्याच्या शोधात उजाड माळरानावर वणवण भटकताना दिसतात.

त्यामुळे शेतकरी नाईलाजाने बैल बाजारात जनावरे विक्रीसाठी घेऊन येत आहेत. तर सध्या साखर कारखान्याचे धुराडे देखील बंद झाल्याने बैल बाजारात गेल्या दोन आठवड्यांपासून गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर जनावरे विक्रीसाठी येत आहेत.

तसेच आठवडे बाजारात जनावरांच्या किमती घटल्याने शेतकऱ्यांना बेभाव जनावरे विकावी लागत असल्याचे पाहायला मिळत आहे.

चारा टंचाईचे दाट संकट

टंचाई काळात मोठ्या जनावरांसाठी १५ किलो व लहान जनावरांसाठी ७.५ किलो हिरवा चारा आणि अनुक्रमे ६ किलो व ३ किलो वाळलेला चारा लागतो. तर मोठ्या जनावरांसाठी ४० लीटर व लहान जनावरांसाठी २० लीटर पाण्याची गरज असते.

सध्या कृषी विभागाच्या खरीप व रब्बी पीक परिस्थितीनुसार शेवगाव तालुक्यात सरासरी ५० दिवस पुरेल एवढाच चारा शिल्लक असल्याचे पशुधन विकास अधिकारी डॉ. मनोज शिंदे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांवर दुष्काळाचे सावट

सध्या पाणी नाही. चारा टंचाई निर्माण झाली आहे. आगामी काळात पाऊस कधी पडेल हे सांगता येणे अवघड आहे. त्यामुळे सध्या शेतकरी हवालदिल झाला आहे. अनेक ठिकाणच्या शेतकऱ्यांनी चर्चा छावणी निर्माण कराव्यात यासाठी मागणी करत आहेत.