Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील अनेक भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. आता आणखी एक जबर मारहाण करत लुटल्याचा प्रकार समोर आला आहे.
मध्यरात्री २ वाजता लघुशंकेसाठी उठलेला तरूणासह त्याच्या कुटूंबीयांना चौघा चोरटयांनी घरात घुसून बेदम मारहाण करत जबरी चोरीचा प्रयत्न केल्याची घटना पाथर्डी तालुक्यातील दुलेचांदेगाव येथे घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दुलेचांदेगाव येथील वैजीनाथ चांगदेव मर्दाने हा विवाहीत तरूण काल बुधवार दि. १० एप्रिल रोजी आपल्या घरी झोपलेला होता.
रात्री २ च्या सुमारास तो लघुशंकेसाठी उठून घराबाहेर आला असता दबा धरून बसलेल्या चौघा चोरट्यांनी अचानकपणे येवून वैजीनाथ याच्यासह त्याची बायको, आई, वडील यांना दगडाने आणि काठीने बेदम मारहाण केली.
या आलेल्या चौघा चोरट्यांनी घरातील मौल्यवान वस्तू तसेच रोकड न घेता जबरी चोरीचा प्रयत्न केला. अशाप्रकारे अचानकपणे त्याच्या घरी चोरटे दबा धरून बसले. चोरट्यांनी ऐवज चोरून न नेता फक्त जबरी चोरीचा प्रयत्न केला व मारहाण करत चोरटे निघून गेल्याने नेमका या चोरट्यांचा काय उद्देश होता?
असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या मारहाणीत वैजीनाथ मर्दाने याच्यासह त्याची आई पुष्पा, वडील चांगदेव, पत्नी मनिषा यांना जबर मार लागला आहे. याप्रकरणी वैजीनाथ याच्या फिर्यादीवरून अज्ञात चौघा चोरट्यांविरूद्ध भादंवि कलम ३९४, ५११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांत भीतीचे वातावरण होते. पोलिसांनी अशा वृत्तीच्या गुन्हेगारांचा तपास लावून गुन्हेगारीचा बिमोड करावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.