अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :- एकेकाळी लखपती असलेल्या वृद्ध व्यक्तीवर आज मुलांच्या हलगर्जीपणामुळे रस्त्यावर राहून उपासमारीची वेळ आली आहे. माणूसकीला काळीमा फासणारी ही घटना अतिशय निंदनीय असून संबंधित वयोवृद्ध इसमाला न्याय मिळावा.
अशी मागणी काही लोकांनी केली आहे. सलिम शहाबुद्दिन इनामदार वय ६६ वर्षे हे राहुरी शहरातील स्टेशन रोड परिसरात रहावयास होते. त्यांची पत्नी अंगणवाडी सेवीका आहे. मुलगा खाजगी नोकरी करून हजारो रूपये महिन्याला कमवतो. तो कोल्हार येथे रहावयास आहे. एक मुलगी आहे. तीचा विवाह होऊन ती चांगल्या घरात आहे.
स्टेशन रोड परिसरात पटेल यांच्या वखारी समोर मोठे कन्स्ट्रक्शन चे काम सुरू असलेली जमिन त्यांची होती. तसेच मुलनमाथा रोडला तीन एकर जमीन आहे. एवढी गडगंज संपत्ती तसेच नातेवाईकांचा मोठा गोतावळा आहे. असे असताना सलीम इनामदार यांना त्यांच्या नातेवाईकांनी घरातून बाहेर हाकलून दिले.
त्यामुळे ते निराधार झाले आहेत. सलीम शहाबुद्दिन इनामदार हे सध्या स्टेशन रोड परिसरात पटेल यांच्या वखारी समोर असलेल्या पडिक जमिनीवर एका मोडकळीस आलेल्या छताचा आधार घेऊन तेथे राहत आहेत. त्यांना उभा राहता येत नाही. तसेच चालता येत नाही. परिसरातील नागरिक त्यांना जेवण आणून देतात.
अशा प्रकारे ते आपले जिवन जगत आहेत. सलीम शहाबुद्दिन इनामदार यांची स्वतःच्या मालकीची लाखों रूपयांची संपत्ती असताना त्यांना त्यांची मुले संभाळत नाहीत. त्यामुळे ते हलाखीचे जीवन जगत आहेत. आई वडील वयोवृद्ध झाल्यानंतर त्यांचा संभाळ करणे हे त्यांच्या मुलांचे कर्तव्य असते.
परंतू सलीम इनामदार यांच्या मुलांनी आपले कर्तव्य विसरून वडीलांना घरातून हाकलून दिले. असे सलीम इनामदार यांनी सांगितले. माझ्या जिवाचा काही भरोसा नाही.
वयोवृद्ध झाल्याने मी कधी मरेन सांगता येत नाही. अशा परिस्थितीत मला कोण न्याय देणार ? असा प्रश्न सलीम इनामदार यांनी केलाय. सलीम इनामदार यांच्या मुलांवर योग्य ती कारवाई करावी. अशी मागणी काही लोकांनी केली आहे.