अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :-शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्यात नावलौकिक असलेल्या रयत शिक्षण संस्थेकडून देण्यात येणारा २०२१ चा राष्ट्रीय पातळीवरील मानाचा लक्ष्मीबाई भाऊराव पाटील जीवन गौरव पुरस्कार बीजमाता पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांना देऊन गौरविण्यात येणार असल्याची घोषणा रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष शरद पवार यांनी केली.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी (२२ सप्टेंबर) घेण्यात आलेल्या व्हर्च्युअल कार्यक्रमांत या पुरस्काराची घोषणा संस्थेचे कार्याध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी केली.
दोन लाख पन्नास हजार रुपये रोख, मानपत्र व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त ९ मे रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या विशेष कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा लक्ष्मीबाई जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. यावर्षी तो अकोले तालुक्यातील आदिवासीबहुल कोंभाळणे येथील रहिवासी बीजमाता पोपेरे यांना जाहीर झाल्यामुळे अकोले तालुक्यासह संपूर्ण राज्यातून व बायफ संचालित सर्व स्तरांतून कार्यरत विभागात आनंदाचे वातावरण आहे.
बायफ संस्थेचे राज्य समन्वयक सुधीर वागळे, नाशिकचे विभागीय व्यवस्थापक जितिन साठे, अकोले तालुका पत्रकार संघाचे संस्थापक व अध्यक्ष विजय पोखरकर यांनी पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांना हा जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचे अभिनंदन केले