अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :- ‘सदाशिव अमरापूरकर मेमोरिअल ट्रस्ट’ आणि ‘तुमचं आमचं’ प्रस्तुत ‘लाली’ हे कृष्णा यमुना विलास वाळके दिग्दर्शित नाटक
पश्चिम बंगालची राजधानी कोलकत्ता येथे होणाऱ्या आठव्या रंगयात्रा राष्ट्रीय नाट्य महोत्सवात गुरुवार दि. २४ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता गोबरदंगा नशा (कोलकत्ता) येथे सादर होणार असल्याची माहिती अभिनेता, लेखक, दिग्दर्शक कृष्णा वाळके यांनी दिली.
कोलकत्ता येथील रंगयात्रा राष्ट्रीय नाट्य महोत्सवाचे हे आठवे वर्ष आहे. लॉक डाऊन संपल्यानंतर रंगमंचावर सादर होणारं नगरमधील हे पहिलेच नाटक आहे. कोरोना महामारी व लॉक डाऊनच्या काळात नाट्यक्षेत्राला अस्थिरतेचे स्वरूप प्राप्त झाले होते. मात्र वर्ष अखेरीस का होईना रंगभूमीवर नाटक सादर करायला मिळतेय यासाठी लालीची संपूर्ण टीम उत्सुक आहे.
लाली या नाटकाला यापूर्वी पुरुषोत्तम करंडक स्पर्धेतील अंतिम व महाअंतिम फेरीत प्रथम क्रमांक पटकविलेला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील अनेक मानाचे व प्रतिष्ठेचे असे ४५ पारितोषिके मिळालेली आहेत. गेल्या २ वर्षांपासून लालीने रंगभूमी गाजविली आहे. नाट्यक्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या नाटकाचे कौतुक केले आहे.
नागपुर येथे झालेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात देखील ‘लाली’ हे नाटक सादर करण्याचा बहुमान मिळालेला आहे. आणि आता हे नाटक महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून थेट कोलकत्ता येथे सादर होत आहे याचा लालीच्या संपूर्ण टीमला अभिमान आहे.
लाली या नाटकात संकेत जगदाळे किसण्याची भूमिका साकारत आहे. तर रेणुका ठोकळे ही आवलीची भूमिका साकारत आहे. योगीराज मोटे नाम्या तसेच ऋषभ कोंडावार अण्णाची भूमिका साकारत आहे. शुभम घोडके ने लाली ला पार्श्वसंगित दिले आहे. तर प्रकाश योजनेची जबाबदारी स्वतः कृष्णा वाळके पार पाडत आहे.
नेपाथ्याची जबाबदारी अथर्व धर्माधिकारी, प्रिया तेलतुंबडे, योगीराज मोटे आणि ऋषभ कोंडावार हे पार पाडत आहे. लाली या नाटकाचे लेखन, दिग्दर्शक, अभिनेते कृष्णा वाळके यांना नुकतेच शेवगाव नाट्य परिषदेच्या वतीने स्व. सदाशिव अमरापूरकर स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
लालीच्या या अभुतपूर्व यशाबद्दल सर्व टीमचे सुनंदा सदाशिव अमरापूरकर, केतकी अमरापूरकर, रिमा अमरापूरकर, शेवगाव नाट्य पारिषदेचे अध्यक्ष उमेश घेवरीकर व उपाध्यक्ष भगवान राऊत यांनी अभिनंदन केले.