अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:- सध्या जिल्हाभरात भुरट्या चोरांनी नुसता उच्छाद मांडला आहे. आता या चोरांनी शहरातील बंद असलेल्या घरांना आपले टार्गेट बनवले आहे.
नुकतीच एका सरकरी वकीलाचे बंद घर फोडून तब्बल५० तोळ्यांचे दागिन्यांची चोरी केल्याची घटना कायनेटिक चौकातील रविश कॉलनी येथे घडली आहे.
याबाबत गोरखनाथ काशिनाथ मुसळे यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, येथील सहायक सरकारी वकील गोरख मुसळे (रा. ध्रुव बंगला राविश कॉलनी कायनेटिक चौक) यांच्या बंगल्याचे कुलूप तोडून चोरांनी आत प्रवेश केला.
त्यांनी घरातील सामानाची उचकापाचक करून बेडरूम मधील कपाटात ठेवलेले ५०तोळे ७ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली.
या प्रकरणी मुसळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या बाबत माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील व कोतवालीचे पोलिस निरीक्षक मानगावकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून तपासाच्या सूचना दिल्या. याबाबत अधिक तपास सपोनि पवार हे करत आहेत.