जबर मारहाण करून लाखो रुपयांचा मुद्देमाल केला लंपास

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर : मध्यरात्रीच्या सुमारास घरात घुसून चार चोरट्यांनी घरात झोपलेल्या कुटुंबाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत घरातील साडे चार तोळे सोन्याचे दागिने व १० हजारांची रोकड असा ऐवज चोरून नेल्याची घटना नगर तालुक्यातील पिंपळगाव कौडा गावात घडली. चोरट्यांच्या मारहाणीत तीनजण जखमी झाले आहेत.

याबाबत बाबासाहेब रंगनाथ केदारे (वय ४५, रा. पिंपळगाव कौडा, ता.नगर) यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. केदारे हे गावात सुपा रोडवर राहत असून गुरुवारी (दि.११) रात्री ते व त्यांचे वृद्ध आई, वडील घरात झोपलेले असताना मध्यरात्री १२.३० च्या सुमारास अनोळखी चार चोरट्यांनी घराच्या दरवाजाची कडी कशाच्या तरी सहाय्याने उघडून घरात प्रवेश केला.

घरातील कपाटाची उचकापाचक केली. या उचकापाचकच्या आवाजाने केदारे व त्यांचे आई – वडील झोपेतून जागे झाले. केदारे यांनी चोरट्यांचा विरोध करण्याचा प्रयत्न केला असता चोरट्यांनी त्यांना व त्यांच्या आई वडिलांनी लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून घरातील १० हजारांची रोकड, केदारे यांची दोन तोळे वजनाची सोन्याची चेन, प्रत्येकी अर्धा तोळ्याच्या चार सोन्याच्या अंगठ्या, त्यांच्या आईच्या गळ्यातील सोन्याचे डोरले, नाकातील मुरणी असा ऐवज बळजबरीने चोरून नेला.

चोरट्यांच्या मारहाणीत फिर्यादी बाबासाहेब केदारे, त्यांचे वडील रंगनाथ केदारे, आई शकुंतला केदारे हे तिघे जखमी झाले आहेत. केदारे यांनी केलेला आरडा ओरडा ऐकून शेजारी राहणारे नागरिक तेथे गेले त्यावेळी त्यांना चोरीची माहिती मिळाली.

नागरिकांनी पोलिसांना कळवत मारहाणीत जखमी झालेल्या तिघांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि. शिशिरकुमार देशमुख, उपनिरीक्षक युवराज चव्हाण हे पोलिस पथक, श्वान पथक, ठसेतज्ज्ञ यांचे पथकासह घटनास्थळी दाखल झाले.

काही वेळाने अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, नगर ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक संपतराव भोसले, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. दिनेश आहेर यांनीही घटनास्थळी भेट देत पाहणी केली.