२३ जानेवारी २०२५ श्रीगोंदा : तालुक्यातील चिखली येथील सुमारे २ हेक्टर ४९ आर शेतजमीनीची तत्कालीन तलाठ्याला हाताशी धरून बनावट व्यक्ती उभे करत संगनमताने परस्पर विक्री केली. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात पोपट सोनावणे रा.निर्वी ता. शिरूर यांच्या फिर्यादीवरून नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास श्रीगोंदा पोलीस करत आहेत.
शिवाजी सुखदेव लंके, अरुण सुखदेव लंके, गोरख दादाभाऊ झेंडे, संभाजी जयसिंग कदम, बाजीराव दादाभाऊ चौधरी, नारायण दादाभाऊ चौधरी, दत्तात्रय बापूराव चौधरी, संजय जयसिंग भापकर, बळीराम शंकर काकडे अशी गुन्ह दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.
याबाबत पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी पोपट सोनवणे यांनी सन १९९४ साली तालुक्यातील चिखली शिवारातील गट क्रं.२१४ मधे २ हेक्टर ४९ आर शेतजमीन खरेदी केली होती.शेतात जाणे शक्य होत नसल्याने फिर्यादीचे नातेवाईक ती शेती बघत होते.
नातेवाईक २०१४ साली मयत झाली.तेव्हापासून फिर्यादीची जमीन पडीक ठेवली होती. २०२४ मध्ये फिर्यादी सदर शेतजमीन मुलीच्या नावे करण्यासाठी गेले असता ती त्रयस्थाने वहिती केल्याचे दिसून आले. फिर्यादीने सातबारा उतारा काढला असता, सन २००३ साली फिर्यादीचे सातबाऱ्यावरील नाव कमी केल्याचे व अन्य नावाची नोंद केल्याचे आढळून आले.
तसेच २००९ साली खोटी सही करून जमीन नावावर करून घेण्यात आल्याचे दिसले. त्यामुळे बनावट कागदपत्रे बनवून फिर्यादीच्या नावावरील शेतजमीन परस्पर नावावर करून घेतली. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस पुढील तपास करत आहेत.