अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:-जिल्ह्यातील गेल्या काही दिवसांपासून चोरी, लुटमारी आदी घटनांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते आहे.
कायदा व सुव्यवस्थेचा धाक चोरट्यांच्या मनात राहिला नसल्याने शहरासह जिल्ह्यात खुलेआम दिवसाढवळ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.
नागरिकांच्या मनात दहशत माजविणाऱ्या चोरट्यांना गजाआड करण्यास पोलीस प्रशासनाला अपयश येत असल्याचे चित्र सध्या शहरात दिसून येत आहे.
नुकतेच शहरातील कायनेटिक चौकातील रविश कॉलनीत घरफोडी करत चोरट्यांनी भरदिवसा 50 तोळे सोने लंपास केले. जिल्हा न्यायालयातील सरकारी वकिल गोरखनाथ काशिनाथ मुसळे (वय 53) यांच्या घरात रविवारी ही चोरी झाली.
अॅड. मुसळे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, अॅड. मुसळे हे नातेवाईकाला भेटण्यासाठी श्रीगोंदा येथे सहकुटुंब गेले होते.
दुपारी साडेतीन ते पावणे सहा वाजेच्या सुमारास बंद असलेले घर फोडून चोरट्यांनी 50 तोळे सोने लंपास केले. मुसळे हे श्रीगोंदा येथून आल्यानंतर चोरीचा हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला.
त्यांनी तत्काळ कोतवाली पोलिसांना माहिती दिली. पोलीस उपअधीक्षक अजित पाटील, पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.
5 लाख 7 हजार रुपये किंमतीचे 50 तोळे 7 ग्रॅम वजनाचे दागिने लंपास झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, रविश कॉलनीत मुसळे यांच्या घराशेजारीच असलेल्या शोरूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, मात्र ते बंद असल्याचे सांगण्यात आले.
चोरट्यांनी मेन दरवाजाचे लॉक आणि लाकडी चौकटीचा हॅडलॉक तोडून घरात प्रवेश केला. त्यामुळे चोरटे हे सराईत असावेत असा संशय व्यक्त केला जात आहे.