अहमदनगर Live24 टीम, 04 एप्रिल 2022 Ahmednagar Crime :- सराईत आरोपी संदीप ऊर्फ संदीप्या ईश्वर भोसले (रा. बेलगाव ता. कर्जत) याला पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तीन दिवस चांदोर (जि. रत्नागिरी) येथे वेशांतर करून खाणीवर ट्रक ड्रायव्हर व मजुर म्हणून काम केले.
खाणीवर कामगारांसोबत काम करत असताना आरोपी भोसले याच्या राहण्याचे ठिकाणाबाबत माहिती काढली. माहिती मिळताच आरोपीच्या राहत्या ठिकाणी सापळा लावुन पहाटेच्या वेळी छापा घातला.
पोलिसांची चाहुल लागताच आरोपी पळुन जावू लागताच पथकातील अधिकारी, अंमलदारांनी त्याचा तीन किलोमीटर पाठलाग करून पकडले.
नगरसह बीड व पुणे जिल्ह्यात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेला आणि एकुण 26 गुन्ह्यात पसार असलेल्या आरोपीला सुमारे तीन किलोमीटर पाठलाग करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडले.
संदीप ऊर्फ संदीप्या ईश्वर भोसले (रा. बेलगाव ता. कर्जत) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. तो विजय नारायण भोसले (रा. वाहिरा ता. आष्टी जि. बीड) असे नाव बदलून रत्नागिरी जिल्ह्यातील चांदोर गावात लाल रंगाचे दगडाच्या खाणीवर काम करत होता.
पोलिसांनी तेथे जावून ही कारवाई केली. संदीप भोसले हा सराईत गुन्हेगार आहे. सातारा, औरंगाबाद, अहमदनगरसह पाच जिल्ह्यात त्याच्याविरूध्द 44 गुन्हे दाखल आहेत. त्याच्या टोळीविरूध्द तीन जिल्ह्यात मोक्का लावण्यात आला आहे. या टोळीत एकुण पाच आरोपी असून तिघांना यापूर्वी अटक करण्यात आली होती.
टोळीप्रमुख संदीप भोसले व आणखी एक आरोपी पसार होते. यातील संदीप भोसले याच्या विषयी पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना माहिती मिळाली होती.
त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलीस अंमलदार सुनील चव्हाण, दत्ता हिंगडे, संदीप पवार, सागर ससाणे, रणजित जाधव यांचे पथक तयार करून रत्नागिरीला रवाना केले.
या पथकाने तीन दिवस मुक्काम करून संदीपच्या मुसक्या आवळल्या. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कामगिरी केली.