अहमदनगर बातम्या

Ahmednagar Water Issue : पुढारी सगळे मत मागत फिरतायत.. मते मागायला दारात या…. मग आमचा हिसका दाखवू…

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Water Issue : उन्हाच्या मरण याताना भोगतोय… विजेचा लपंडाव चालूच आहे.. त्यातच आठ-आठ दिवस प्यायला पाणी नाही.. जगायचे की मरायचे… पाणी द्या. परिसराची स्वच्छता करा.

पुढारी सगळे मत मागत फिरतायत.. मते मागायला दारात या…. मग आमचा हिसका दाखवू… प्रशासनाला ज्या भाषेत आमची भावना कळेल, तसे आम्ही पाण्यासाठी काहीही करू… गावात जनावरं राहतात की माणसं… याचा विचार करा.

पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींचा निषेध करत संतप्त महिलांनी पालिका कार्यालयावर पाणी व नागरी समस्यांबाबत हंडा मोर्चा काढला.

संतप्त महिलांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना धारेवर धरत अत्यंत तीव्र शब्दांत भावना व्यक्त केल्या. पार्वती साळवे या महिलेला तीव्र उन्हामुळे बोलताना संताप अनावर झाल्याने रक्तदाब वाढून चक्कर आली.

या वेळी बोलताना साळवे म्हणाल्या, पालिका आरोग्य कर्मचारी आमच्या भागात फिरकत नाही. घाणीचे व काटेरी झुडपांचे साम्राज्य पसरले आहे. डास, दुर्गंधीमुळे जीव मुठीत धरून जगतोय. पुढारी राहतात तिकडे स्वच्छता व आमचा भाग मात्र जाणीवपूर्वक टाळला जातो.

सर्व गावाला पूर्णदाबाने तासभर पाणी तर आम्हाला मात्र अत्यंत कमी दाबाने अर्धा तास पाणी आठ दिवसांतून एकदा मिळते. ओल्या कपड्याने अंग पुसले तरी आठ दिवस आम्हाला नळाचे पाणी आंघोळीसाठी पुरणार नाही. पुढारी तोंड दडून बसले. कोणत्याही निवडणुकीत दारात या, तेव्हा उत्तर देऊ तुम्हाला. गाव विकून खायचे तर खा, पण आम्हाला प्यायला पाणी व जगायला स्वच्छ परिसर द्या.

महागाईने कितीही कष्ट केले तरी पोटाचे खळगे भरत नाही. शिळी भाकर व पाणी कालवून खायलासुद्धा पाणी नाही. तुमच्या दारात येऊन राहतो, आम्हाला फक्त पाणी द्या आणि उन्हापासून रक्षण करा.

पाणीपट्टी, घरपट्टीसाठी आमची घरे जप्त करायला येता. मग आम्हाला प्यायला पाणी कोण देणार? पाणी योजना होणार आहे, या आश्वासनाने तहान भागत नाही. तुम्ही दोन तास फक्त पाण्यावाचून राहून दाखवा.

असे म्हणताच उपस्थित कर्मचारी निरुत्तर झाले. नीलम घोडके म्हणाल्या, दहा दिवसांतून एक वेळ पाणीपुरवठा अत्यंत कमी दाबाने होतो.

परिसरातील सर्व हातपंप आटले आहेत. गावात कोठेही पाणी राहिले नाही. विकतचे पाणी सोन्यापेक्षा महाग झाले आहे. कर्मचारी दुरुत्तरे देतात, टाकीत पाणी नाही, वीजपुरवठा बंद होता, वॉल्व्ह खराब आहे, पाईपलाईन फुटली आहे, अमरापुरला टँकर भरले जातात म्हणून पाणी मिळत नाही, अशी उत्तरे देतात.

पाणी कमी मिळूनही जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग, अधिकारी, लोकप्रतिनिधी नेमके गावासाठी काय करतात, असा प्रश्न निर्माण होतो. गावाला कोणी वाली उरले नाही. सर्वत्र घाण, डासांचे साम्राज्य, दूषित पाण्यामुळे साथ रोगाचा फैलाव सुरू आहे.

सध्या शहराला फक्त वीस ते बावीस लाख लिटर पाणी मिळते. पाण्याची दैनंदिन मागणी व मंजुरी ३५ लाख लिटरची असून, पालिकेच्या उदासिनतेमुळे जिल्हा परिषद लक्ष देत नाही. जिल्हा परिषदेने पाण्याचा कालावधी दोन तासाने वाढवावा.

आम्हाला दोन दिवसाआड पाणी दिले तरी चालेल, पण तहान भागवण्यापुरते तरी पाणी द्या. आज आम्ही शांततेत आलो. पुढचा मोर्चा तुमच्या लक्षात राहील, असा काढू, जिल्हा परिषदेच्या दारात प्रसंगी आंदोलन करू. जिल्हा परिषदेने टंचाई परिस्थिती लक्षात घेता पालिकेला पाण्याचा कालावधी व जास्त पाणी वाढवून द्यावे.

वॉल्व्ह खराब असेल तर तो आम्ही दुरुस्त करणार का? गेली अनेक वर्षांपासून आम्ही वॉल्व्ह खराब आहे. एवढंच उत्तर ऐकतो. तर तो दुरुस्त करण्याची जबाबदारी कोणाची आहे. आमची एक भगिनी आज चक्कर येऊन पडल्याने आज आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवून माघारी फिरतो.

पुढच्या वेळेस तुम्हाला कार्यालय बाहेर काढू. अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या. उपस्थित महिलांनी घोषणा देत निषेध केला. पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वॉल्व्ह दुरुस्तीसह जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधण्याचे आश्वासन दिल्यावर आंदोलन तात्पुरते स्थगित केले.

पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे शेवगाव पालिकेचाही पद्मार असल्याने व पाथर्डी- शेवगाव दोन्ही पालिकांना एकाच जायकवाडी उद्भवावरून पाणी मिळत असल्याने त्यांनी याबाबत जातीने लक्ष घालून दोन्ही शहरांना वाढीव पाणीपुरवठा व वीज पंपाचा कालावधी जिल्हा परिषदेने विशेषतः पाणीपुरवठा विभागाने वाढवून द्यावा, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. पाण्यासाठी संतप्त नागरिक येत्या काळात कुठलेही टोकाचे पाऊल उचलतील, एवढी परिस्थिती हाताबाहेर जात आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office