अहमदनगर बातम्या

पुढाऱ्यांनी घातले जिल्हा परिषदेचे वर्षश्राद्ध ! झेडपी, पंचायत समित्यांच्या निवडणुका होत नसल्याने सरकारचा निषेध

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका दोन वर्षांपासून झालेल्या नाहीत. दोन वर्ष प्रशासक या ठिकाणी लागू आहे. या निवडणुका न घेतल्याने शासनाने एक प्रकारे लोकशाहीची हत्या केली आहे असा घणाघात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी केला आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका दोन वर्षांपासून झालेल्या नाहीत. दोन्ही ठिकाणी प्रशासक राज सुरु आहे. याच्या निषेधार्थ दुसरे वर्षश्राद्ध घालत अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्ले बोलत होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, पंचायत समितीचे माजी सभापती रामदास भोर, पंचायत समितीचे माजी सदस्य पोपट निमसे, गणेश वायसे, जिवाजी लगड आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना संदेश कार्ले म्हणाले, दोन वर्षांपासून निवडणुका नाहीत. या निवडणुका झाल्या असत्या तर सरकारला जनतेत त्यांच्याबद्दल किती नाराजगी आहे याची कल्पना आली असती. आज प्रशासनाला सामान्य जनतेचे प्रश्न नेमके काय आहेत याची जाणीव नाही.

येथे जर लोकप्रतिनिधी असते तर ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या सुटल्या असत्या. कारण लोकप्रतिनिधींचे कामच ते असते. म्हणजेच या सरकारने या निवडणुका न घेता एकप्रकारे नागरिकांवर अन्यायच केला असल्याचे कार्ले म्हणाले.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांनीही घणाघात केला. ते म्हणाले, जिल्हा परिषद, पंचायत समित्या संपवण्याचा हा एक प्रकारे सरकारचा डाव असल्याची शंका येऊ लागली आहे. प्रशासन देखील कुणाच्यातरी इशाऱ्यावर चालत आहे.

कारण निधी वाटपात मोठा भेदभाव केला जात आहे. याठिकाणी जर लोकप्रतिनिधी असते तर निधीचा सदुपयोग झाला असता असे हराळ म्हणाले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office