Ahmednagar News : मनोज जरांगे पाटील यांच्यासह लाखो मराठा समर्थकांनी काल अहमदनगरमध्ये प्रवेश केला. त्यांनी यावेळी मोठी गर्जना केली. मी सरकारला मॅनेज होत नाही व फुटतही नाही, हीच सरकारची मोठी अडचण आहे. ६० ते ७० वर्षे आरक्षण दिले नाही.
आता सात महिन्यांचा वेळ दिला आहे, तरी निर्णय होत नाही. त्यामुळे आता आरक्षणासाठी आरपारची लढाई सुरू आहे. सरकारने काही दगाफटका केला तरी हे आंदोलन सुरूच राहील. सत्तेची धग व मस्ती कोणाच्या डोक्यात गेली असेल
तर ती उतरविण्याची जबाबदारी मराठा समाजावर सोडा असे आवाहनच मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिले.
काल दुपारी ही पदयात्रा पाथर्डी तालुक्यातील आगसखांड शिवारात जेवणासाठी थांबली. यावेळी आयोजित सभेत जरांगे पाटील यांनी समाज बांधवाशी सवांद साधला, तत्पूर्वी सकाळी मिडसांगवी येथे जरांगे पाटील यांचे आगमन झाले.
तेथे मिडसांगवी व भालगाव, खरवंडी कासार, मुंगुसवाडे, ढगेवाडी येथील ग्रामस्थांनी आंदोलकांना अल्पोपहार दिला. येळी, भुते टाकळी, आगसखांड फाटा येथे आ. मोनिका राजळे यांनी स्वागत केले.
जेसीबीतून फुलांचा वर्षाव, दहा किमी वाहनांच्या रांगा
पाथर्डीत आगमन होताच मनोज जरांगे पाटील यांच्यावर सतरा जेसीबीतून फुलांचा वर्षाव करण्यात आला. भव्य हार त्यांना घालण्यात आला. त्यानंतर त्यांचा ताफा माळीबाभुळगाव, तिसगाव, करंजी मार्ग नगरच्या दिशेने रवाना झाला. त्यांच्या समवेत हजारो वाहनांचा ताफा आहे.
त्यामुळे पाच ते दहा किमी अंतर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. टाकळी फाटा येथे आमदार मोनिका राजळे यांनी जरांगे पाटील यांचे स्वागत केले. अॅड. प्रताप ढाकणे यांनी देखील जरांगे पाटील यांचे स्वागत केले.
लाखो लोकांना भरपेट जेवण,महिलांनी पहाटेच सुरु केला होता स्वयंपाक
मराठा समाजातील दानशूरांनी एवढी जेवणाची व्यवस्था केली की आंदोलकांना जेवण करून त्यांच्या सोबत जेवणाची पॅकेटे व पाण्याचे बॉक्स देण्यात आले. महिलांनी सकाळी उठून केलेल्या भाकरी, चपाती व भाज्या दोन्ही ठिकाणी पोहच केल्या होत्या,
पाण्याच्या बाटल्यांनी भरलेली अनेक वाहने शिल्लक राहिली होती. जेवणही मोठ्या प्रमाणात शिल्लक राहिले. यावेळी युवकांचा मोठा सहभाग होता.
नगर- पाथर्डी रोडवर हजारोच्या संख्येने समाज बांधव
जरांगे पाटील यांची एक झलक पाहण्यासाठी हजारोच्या संख्येने समाज बांधव स्स्त्यावर ठिकठिकाणी दुपारी चार वाजल्यापासून उभे होते. तिसगाव येथे त्यांचे रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास आगमन झाले. त्यानंतर करंजी व त्यानंतर मराठवाडी या ठिकाणी आगमन झाले.
तिसगाव येथे शिरापूर, जवखेडे, मांडवे, घाटशिरस, कासार पिंपळगाव, जोडमोहोज या परिसरातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. भोसे, दगडवाडी, बाभळगाव, सातवड, लोहसर, चिचोंडी शिराळ मिरी येथील नागरिकांनी त्यांचे स्वागत केले.
सायंकाळपासून या परिसरातील संपूर्ण रस्ते जरांगे पाटील यांच्यासोबत असलेल्या चार चाकी, दोन चाकी वाहनांनी अक्षरशः फुलून गेले होते.