अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :- जामखेड तालुक्यातील सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत गुरुवार,दि.२८ ज़ानेवारी रोज़ी जामखेड येथील राज लॉन्स येथे सकाळी अकरा वाजता काढण्यात येणार असल्याची माहिती तहसील विशाल नाईकवाडे यांनी दिली आहे.
जामखेड तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. अनेक धक्कादायक निकाल समोर आले. जय पराजयाच्या कारणांची जोरदार चर्चा ग्रामीण भागात सुरू आहे.
सरकारने निकालानंतर सरपंच पदाचे आरक्षण काढण्याचा निर्णय घेतल्याने हिरमोड झाला होता. सध्या सर्व विज़ी सदस्यांचे देव पाण्यात असून, सरपंच पद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव होते, याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.
दि.२८ ज़ानेवारीला ४९ गावच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर होणार आहे. त्यानंतरच गावावर कोणाची सत्ता येणार, याचे चित्र समोर येणार आहे. सदस्य एका पॅनलचा आणि सरपंच दुसऱ्याच विरोधी पॅनलचा, अशी स्थिती होण्याची शक्यता आहे.
जामखेड येथील राज लॉन्स येथे सकाळी अकरा वाजता आरक्षणाची सोडत निघणार आहे. सरपंच पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याची गावखेड्यात प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे.