Ahmednagar News : जिद्द असेल, चिकाटी असेल तर परिस्थितीलाही वाकवता येते. असणारे दिवस पालटवता येतात व स्वप्न साकार करता येते असे म्हटले जाते. पण याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील विकास.
अधिकारी झाल्याशिवाय गावाकडे फिरकायचे नाही अशी खूणगाठ मनात बांधत पोराने घर सोडलं. शहरात राहून फळे विकली. हे करताना स्पर्धा परीक्षा दिली. दोनदा अपयश पदरी पडलं पण तिसऱ्या वर्षी यश मिळवलं व तो अधिकारी झाला.
या तरुणाचे नाव आहे विकास मोरे. नांदूर खंदरमाळ (ता. संगमनेर) येथील तो रहिवासी असून मोरे या शेतकरी कुटुंबात विकासचा जन्म झाला.
दुष्काळी भागातील तरुणांसाठी आदर्श
नांदूर खंदरमाळ हा भाग तसा पाहिला तर दुष्काळी. अनेक तरुण स्थित्यंतर करतात. पोलिस उपनिरीक्षक होण्याचं स्वप्न घेऊन विकासही बाहेर पडला. पुण्यात जाऊन त्याने स्पर्धा परीक्षा दिल्या. खर्चासाठी पैसे पाहिजेत म्हणून फळांचे दुकान लावत फळे विकली.
त्यानंतर मेस चालवली. हे काम आटोपल्यावर तो वाचनालयात जायचा. दोनदा अपयश आले, नंतर मात्र त्याने यशाला गवसणी घातली. पोलिस उपनिरीक्षक झाला. या यशात त्याला त्याचे वडील मनाजी, आई सुरेखा, पत्नी चैताली, भाऊ शरद यांची मोलाची साथ मिळाली. दुष्काळी भागातील तरुणांसाठी मोठा आदर्श विकास याने निर्माण केलाय.
जिद्द, चिकाटी आणि मेहनतीचे फळ
विकास मोरे सांगतात की, जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही. फक्त आपल्याजवळ जिद्द, चिकाटी आणि खूप मेहनत करण्याची तयारी असावी लागते. मी अधिकारी व्हावे, असे वडिलांचे स्वप्न होते. ते मी पूर्ण करू शकलो. याचे मला समाधान असल्याचे ते म्हणाले आहेत.
गावात स्वागताची तयारी
विकास यांच्या या यशाने कुटुंब तसेच गाव देखील आनंदित झाले आहे. तो जिद्दी आहे. त्याने आज आमचे स्वप्न पूर्ण केले. आमच्या परिवाराच्या आनंदाला पारावार राहिला नाही असे त्याचे वडील मनाजी मोरे सांगतात. गाव देखील आनंदित आहे. गाव सध्या त्याच्या स्वागताची तयारी करत आहे.