कॉलेजला चाललेल्या विद्यार्थ्यांवर बिबट्याचा प्राणघातक हल्ला

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याने अनेकांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. यातच बिबट्याने पुन्हा एकदा धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे.

बिबट्याच्या हल्यात अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. तर काहींना बिबट्याने गंभीर जखमी केले आहे.नुकतेच बिबट्याने संगमनेर मध्ये एक तरुणावर हल्ला करत त्याला गंभीर जखमी केले आहे.

संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील आंबीदुमाला येथे बिबट्याच्या हल्ल्यात संदेश बाळासाहेब नरवडे हा तरूण जखमी झाला आहे. सदर घटना नुकतीच घडली असून, बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने तात्काळ पिंजरा लावला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, संगमनेर तालुक्यातील आंबीदुमाला गावांतर्गत असलेल्या उंबरी येथील बाळासाहेब नरवडे या शेतकर्‍याचा मुलगा संदेश हा बुधवारी सकाळी महाविद्यालयाला जाण्यासाठी घरून निघाला होता.

त्या दरम्यान तो घरापासून काही अंतरावर आला असता दबा धरुन बसलेल्या बिबट्याने संदेशवर पाठीमागून हल्ला करत पायावर पंजा मारला. त्यामुळे त्याने मोठमोठ्याने आरडाओरड केल्याने बिबट्याने लगेच धूम ठोकली.

संदेशचे वडील बाळासाहेब नरवडे यांनीही तात्काळ आवाजाच्या दिशेने धाव घेतली आणि जखमी संदेशला उपचारार्थ बोटा ग्रामीण रुग्णालयात आणले.

हल्ल्यानंतर वन विभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी घटनास्थळी पिंजरा लावला आहे. यापूर्वीही बिबट्याने याच परिसरात एका शेतकर्‍यावर हल्ला करत जखमी केले होते.

अहमदनगर लाईव्ह 24