श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ७ मधील एका गोठ्याच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात नुकताच बिबट्या कैद झाला आहे. त्यामुळे श्रीरामपूर शहर परिसरात बिबट्याचा संचार आल्याचे स्पष्ट होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बेलापूर नाक्याच्या पूर्व बाजूला असणाऱ्या महाले पोदार शाळेच्या समोर विरेंद्र यादव यांचा गायींचा गोठा आहे. या गोठ्याजवळ त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला आहे.
काल गुरूवारी (दि.२१) पहाटे एक बिबट्या या ठिकाणी आला. त्याने एका कुत्र्यावर झडप मारली. मात्र हे कुत्रे पळून जाण्यात यशस्वी ठरले. त्यानंतर बिबट्याही त्याच्या दिशेने जाताना या सीसीटीव्हीत दिसत आहे.
हा सर्व प्रकार काल गुरूवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडला आहे. बिबट्याच्या अचानक येण्यामुळे येथे बांधलेली गायी, म्हशी जनावरे काही काळ बिथरली होती.
अगदी शहराच्या हद्दीवर हा बिबट्या आल्याचे यावरून स्पष्ट होते. त्यामुळे पहाटे फिरायला जाणाऱ्यांनी आता काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.