अहमदनगर Live24 टीम, 05 फेब्रुवारी 2021:-जिल्ह्यात बिबट्याची दहशत काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. दरम्यान अनेकदा बिबट्या शिकारीच्या शोधात असताना मृत झालेला आहे.
असाच काहीसा प्रकार राहुरी तालुक्यात घडला आहे. राहुरी तालुक्यात आरडगाव परिसरात मृतावस्थेत बिबट्या आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, राहुरी तालुक्यातील पूर्व भागातील आरडगाव शिवारामध्ये मुळा डाव्या कॅनॉलमध्ये सकाळी सहाच्या सुमारास एक बिबट्या पाण्यामध्ये मृतावस्थेत आढळून आला.
परिसरातील नागरिकांनी बिबट्या पाहिला असता हा मृत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून ही माहिती दिली. पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सदर माहिती ही वन विभागाला दिली.
त्या मृत बिबट्याला पाण्यातून बाहेर काढल्यानंतर सदर मृत बिबट्या बघण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, हा बिबट्या पाण्यात पडून मृत्यू झाला की अन्य कुठल्या कारणाने मृत झाला हे उशिरापर्यंत समजू शकले नाही.