Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव (गुफा) परिसरात बिबटयाने दोन दिवसांत पाच शेळ्यांवर हल्ला केला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वस्तीवरील जालिंदर मायंजी नजन या शेतकऱ्यांच्या शेळीवर शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास एका शेळीवर तर,
रविवारी पहाटे विष्णू रामनाथ आहेर यांच्या येथे बिबट्याने हल्ला करून चार शेळ्यांचा पडशा पाडल्याची घटना घडली आहे.
भातकुडगाव येथील (गुफा) शिवारातील नजन वस्ती जवळ येथून एक महिन्यापूर्वी पिंजऱ्यात बिबट्या अडकला होता. पिंजऱ्यात अडकलेला बिबट्या हा नर जातीचा होता. तर आज शेळीवर हल्ला करणारा बिबटया मादी असू शकते, असा असे वनअधिकारी श्रीमती स्वाती ढोले यांनी सांगितले.
तर पाळीव प्राण्यांची शिकार करून बिबट्या याच परिसरात असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. या वेळी वन अधिकारी श्रीमती स्वाती ढोले, कर्मचारी प्रतीक लोंढे यांच्या उपस्थितीत सरकारी डॉक्टरांनी मृत शेळयांचा पंचनाम केला आहे.
सध्या परिसरात बिबट्याचा वावर असून, पाळीव प्राण्यांवर नेहमी हल्ले होत आहेत. नजन वस्ती व भातकुडगाव गुंफा परिसरातील नागरिकांनी सतर्क रहावे, शेतात काम करताना एकट्याने जाऊ नये, असे आवाहन सेवा संस्थेचे चेअरमन सचिन फटांगरे यांनी केले आहे.
परिसरातील म्हसोबा वस्ती परिसरात बिबट्याचे कायम दर्शन होते. पाळीव प्राण्यावर हल्ले होत आहे. शेजारच्या आखातवाडे शिवारात मानवावर बिबट्याचा हल्ला झाला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा (ड्रोन कॅमेराचा ) आधार घेऊन बिबट्याचा शोध वनधिकारी यांनी करावाः – राजेश फटांगरे मा. सरपंच भातकुडगाव.