श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर कोल्हार रस्त्यावरील उक्कलगाव शिवारात मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमाराला बिबट्याच्या हल्ल्यात कालवड फस्त झाली. बिबट्याचा गेल्या काही दिवसांपासून या शिवारात धुमाकूळ सुरू असल्याची माहिती परिसरातील शेतऱ्यांनी दिली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, थोरात वस्तीवर धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याने कालवडीवर हल्ला चढविला. कोल्हार बेलापूर रस्त्यावरील गळनिंब शिवारात सुरेश विश्राम थोरात यांची शेतवस्ती आहे. थोरात यांच्या वस्तीवर दुभती जनावरे बांधलेली होती. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमाराला बिबट्याने कालवडीवर हल्ला चढवत फस्त केली.
मात्र रात्रीला गायाच्या हंबरड्यामुळे थोरात कुटुंबिय जागे झाल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. तोपर्यंत बिबट्याने कालवड मकाच्या शेतात ओढून नेत ठार केली. याबाबत काल बुधवारी (दि.१७) सकाळी वनविभागास घटनेची माहिती दिल्यानंतर वनपाल अक्षय बडे यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. दरम्यान बिबट्याने कालवड ठार केल्यामुळे थोरात यांचे मोठे नुकसान झाले.
आधीच दूधाला भाव नाही आणि त्यातच बिबटे पाळीव प्राण्यांवर हल्ले चढवत आहे. दुसरीकडे दररोज बिबट्याची दहशत वाढत असल्याचे चित्र आहे. तसेच ऐनतपुर वळदगाव शिवारात बिबट्याने शेळीचा फडशा पडल्याची घटना घडली. बिबट्याच्या मुक्त संचारामुळे शेतशिवारात राहणाऱ्या शेतकऱ्यांनी धास्ती घेतली आहे.
बिबट्याचा बंदोबस्त करत शेतकऱ्यांना भयमुक्त करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मृत कालवडीचा पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. उक्कलगाव परिसरातील कुठल्या ना कुठल्या भागात बिबट्याने दर्शन दिल्याची माहिती मिळते.
काही दिवसांपूर्वी याच बिबट्याच्या हल्ल्यात मुलीचा बळी गेल्याची घटना घडली होती. दरम्यान, वळदगांव ऐनतपूर शिवारात बिबट्याचा उपद्रव अनेक दिवसांपासून सुरु असून आता तर तरुण शेतकऱ्यांवर हल्ला झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून वनविभागाने अनेक ठिकाणी पिंजरे लावून या बिबट्याला पकडावे, अशी संतप्त मागणी शेतकरी, नागरीकांनी केली आहे.
बिबट्याचा तरूणाच्या वाहनावर हल्ला
श्रीरामपूर शहरालगत असलेल्या ऐनतपूर शिवारात पोल्ट्री फार्मवर चालेला तरुण ऋषीकेश संदिप गायकवाड यांच्या वाहनावर बिबट्याने नुकताच हल्ला केला. यावेळी बिबट्याच्या पंजाने संदीपचा टि-शर्ट फाटून हाताला वरखडा बसला आहे.
या थरारक घटनेने गायकवाडने न घाबरता गाडी पुढे नेली. अन्यथा जीवावर बेतले असते. मंगळवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास हि घटना घडली तसेच रात्री पुन्हा बिबट्याने याच भागात अरुण नारायण शेळके यांच्या शेळीचे नरडे फोडले. ती शेळी गंभीर जखमी असून तिची वाचण्याची शक्यता कमी आहे.
दरम्यान, वळदगाव शिवारातील शिवशंकर मळ्यात बिबट्याने २ ते ३ कुत्रे फस्त केले आहे. त्यामुळे येथे पिंजरा लावला असून बिबट्या पिंजऱ्या भोवती येवून जातो हे ठशावरून दिसून आले. त्यामुळे परिसरात तातडीने पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.