Ahmednagar News : कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी, पानमळा, इस्लामवाडी चांदेकसारे परिसरात बिबट्याची मोठी दहशत पसरली असून काल या बिबट्याने रानातील डुक्करे व कुत्र्यांची मोठी शिकार केली आहे.
या बिबट्याची दहशत वाड्या वस्त्या वरील नागरिकांमध्ये पसरत आहे. या बिबट्याचा वन विभागाने त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी अण्णा होन यांनी केली आहे.
सध्या या परिसरात काळे कारखाना व कोल्हे कारखान्याच्या ऊस तोडी सुरू आहे. यामुळे बिबट्याने आपला मोर्चा वाड्या वस्त्यावर वळवला आहे. चांदेकसारे ज्ञानेश्वर भिवराव होन व अण्णासाहेब मोहन होन यांच्या शेतात या बिबट्याने पाळीव कुत्र्याची शिकार करत आपली दहशत कायम ठेवली आहे.
सोनेवाडी परिसरात या बिबट्याने पाळीव शेळ्या, कालवडी गायी आदींची शिकार केली. वन विभागाने या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा अशी मागणी सरपंच शकुंतला गुडघे, उपसरपंच संजय गुडघे, पोलीस पाटील दगू गुडघे, निरंजन गुडघे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजेंद्र गुडघे, धर्मा जावळे, आबासाहेब जावळे, चिलुभाऊ जावळे यांनी केली.
मात्र वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले असून या परिसरात अजूनही पिंजरा लावण्यात आला नाही. आता नव्यानेच चांदेकसारे परिसरात बिबट्याने आपला मोर्चा वळवल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.
या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने तातडीने इस्लामवाडी पानमळा परिसरात पिंजरा लावा, अशी मागणी होन यांनी केली आहे.