अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- शहरातील नागरिकांना खराब रस्त्यांमुळे अनेक त्रासांना सामोरे जावे लागत होते. परंतु आता पावसाळा उघडल्याने या सर्व रस्त्यांच्या कामाला गती देण्यात येणार आहे.
नियोजन पद्धतीने टप्प्या-टप्प्याने शहरातील सर्व रस्त्यांचे काम आता मार्गी लागणार आहे असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले. शहरात अनेक रस्ते डांबरीकरण व काँक्रिटीकरणाचे मंजूर असून या कामांनाही गती देण्यात आली आहे.
पुढील काही दिवसांमध्ये शहरांमधील बहुतांश रस्त्यांची कामे मार्गी लागून हा खराब रस्त्यांचा प्रश्न आता निकाली लागणार आहे. शनिवारी नगर शहरामध्ये न्यू आर्ट्स कॉलेज समोरील रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण कामाची आ.संग्राम जगताप यांनी पाहणी केली.
यावेळी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, अनेक दिवसांपासून खड्ड्यांचे प्रश्नही प्रलंबित होते पावसाळ्यामुळे डांबरीकरणाचे काम हाती घेता येत नव्हते. परंतु आता पावसाळा संपला आहे त्यामुळे रस्ता डांबरीकरण व मजबुतीकरण कामाला गती देण्यात आली.
नगर शहरामध्ये अनेक कॉंक्रिटीकरणाचे रस्ते देखील मंजूर आहेत ते देखील कामे आता सुरू होतील. नगर शहरातील विविध रस्त्यावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. या खड्डयामुळे वाहनधारकांसह पायी जाणाऱ्या नागरिकांना चांगलीच कसरत करावी लागत होती.
दरम्यान खड्डे बुजवून मजबुतीकरणाचे काम पूर्ण झाले होते, आता पावसाळा संपल्यानंतर सर्वत्र डांबरीकरणाने खड्डे बुजवण्याचे काम शहरात सुरू झाले आहे.