Ahmednagar News : यंदा नगर जिल्ह्यात वेळात मान्सून दाखल झाला आहे. त्यात नगर दक्षिणेत चांगला पाऊस झालेला असून यामुळे याठिकाणी हंगाम जोरात आहे. खरीप हंगाम सुरू झालेला असून, बाजारामध्ये शेतकऱ्यांची बी-बियाणे, खते व इतर साहित्य खरेदीसाठी धावपळ सुरु आहे. दि. १० जुलैपर्यंत जिल्ह्यात जवळपास ९७ टक्के खरीप हंगामाची पेरणी झाली आहे.
या काळात खते, बियाणे काळा बाजार, खरेदी विक्रीचे दप्तर न ठेवणे, बियाणांची गुणवत्ता यासह अन्य तक्रारीच्या अनुषंगाने कृषी विभागाने तपासणी करत जिल्ह्यातील तश्या २० कृषी सेवा केंद्राचे परवाने कायमस्वरूपी, तर २२ परवाने तात्पुरते निलंबित करण्यात आले आहेत. तर नेवासा, पाथर्डी, श्रीगोंदा, नगर आणि कर्जत तालुक्यातील कृषी सेवा केंद्रावर कारवाई केली आहे.

सध्या जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे , त्यामुळे शेतकऱ्यांनी मूग, तूर, कापूस, सोयाबीन, बाजरी आदी पिकांची पेरणी केलेली आहे. मात्र अनेकदा ऐन हंगामात शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाचे बियाणे दिले जाते त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. ते टाळण्यासाठी यंदा कृषी विभागाने जिल्हास्तरावर आणि तालुकास्तरावर याबाबत तक्रार निवारण कक्षांची स्थापना केलेली आहे.
शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे उपलब्ध व्हावेत, कमी दर्जाच्या बियाणांमुळे फसवणूक होऊ नये, यासाठी जिल्ह्यातून बियाण्यांचे ३५५, खतांचे ३५० आणि कीटक नाशकांचे ७८ नमुने काढून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत.
तसेच जिल्हास्तरावर १ व प्रत्येक तालुका स्तरावर १ अशी १५ भरारी पथके जिल्ह्यामध्ये कार्यरत करण्यात आलेली असून भरारी पथकामार्फत विक्रेत्याची अचानक तपासणी केली जात आहे.
निरीक्षकांनी केलेल्या तपासणीमध्ये दोषी आढळून आलेल्या आतापर्यंत १६ बियाणे विक्री केंद्राचे, ४ खते विक्री केंद्राचे आणि २ कीटकनाशक विक्री केंद्राचे परवाने तात्पुरते तर ८ बियाणे, ९ खते आणि ३ कीटकनाशक परवाने कायम स्वरूपी रद्द करण्यात आलेली आहेत. १५ पेक्षा जास्त केंद्रांना नोटीस बजावण्यात आलेले आहे. अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी सुधाकर बोराळे कृषी दिली .