Ahmednagar News : कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे हद्दीतून जाणारा समृध्दी महामार्गाचे ठिकठिकाणी असणाऱ्या बोगद्यात प्रकाशासाठी बसवलेली लाईट यंत्रणा व रस्त्यावर दुतर्फा बसवलेले पथदिवे गेल्या अनेक दिवसापासून बंद पडले आहे.
त्यामुळे बोगद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अंधार पडून अपघाताचा धोका निर्माण झाल्याने पायी चालणारे सायकलस्वार, दुचाकीस्वार यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे विकासाला गती मिळाली आहे. समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी असा ५२० किलोमीटरच्या या पहिल्या टप्प्यातील वाहतूक, दळणवळण सेवेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर येथून लोकार्पण झाले आणि महामार्ग वाहतूकीसाठी सर्वसामान्यांना खुला झाला.
शिर्डी ते भरवीर (इगतपूरी ) पर्यंत ८० किलो मीटरच्या दुसर्या टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थित कोकमठाण येथे झाले.
समृद्धीच्या एकूण ७०१ कि.मी पैकी आता एकूण ६०० कि.मी लांबीचा समृद्धी महामार्ग वाहतूकीस खुला झाला आहे. समृध्दी महामार्गापासून शिर्डीचे अंतर १० किलोमीटर आहे. त्यामुळे उत्तर अहमदनगर जिल्ह्यातील तालुक्यांच्या कृषी, उद्योग व व्यवसायाला चालना मिळून या परिसराच्या विकासाला चालना मिळणार आहे.
मात्र समृद्धी महामार्गाचे खालून चांदेकसारे हद्दीमध्ये ग्रामीण रस्ते तसेच राज्य महामार्ग व राष्ट्रीय महामार्ग समृद्धीच्या खालून गेल्यामुळे त्या ठिकाणी समृद्धी महामार्गाच्या रुंदी इतके मोठ-मोठे बोगदे तयार झाले आहेत. या बोगद्यांमध्ये रात्रीच्या वेळेला उजेड राहावा, यासाठी स्वतंत्र लाईट यंत्रणा उभारलेली आहे.
मात्र गेल्या अनेक दिवसापासून ही यंत्रणा बंद अवस्थेत असल्यामुळे त्या ठिकाणी प्रचंड अंधार असतो व त्यामुळे परिसरातील नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. या परिसरात वाढलेले अपघाताचे प्रमाण, वाढलेल्या भुरट्या चोऱ्या, रहदारीला अडथळा निर्माण होईल,
अशा पद्धतीत उभी राहणारी मोठी अवजड वाहने, यामुळे जनसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. परंतु याकडे पोलीस प्रशासनाचे सोयीस्कररित्या दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.
‘चांदेकसारे गावालगत समृद्धी महामार्गाखालून जाणाऱ्या राज्य महामार्गावर मोठ-मोठे खड्डे पडलेले आहेत. त्या ठिकाणी मोठ्या व अवजड वाहनांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच ऊस वाहतूकीस देखील हे खड्डे अपघातास कारणीभूत ठरू शकतात.
समृद्धी महामार्ग व राज्य महामार्ग या दोघांच्या ओढाताणीत मात्र नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या सर्व गोष्टीकडे संबंधित यंत्रणेने त्वरित लक्ष देऊन खड्डे बुजवावे व लाईट यंत्रांना पूर्ववत चालू करावी, अशी मागणी चांदेकसारे ग्रामस्थांनी केली आहे.