अहमदनगर Live24 टीम, 11 ऑक्टोबर 2021 :- राहुरी तालुक्यात शनिवारी सायंकाळी विजेच्या कडकडाटासह पावसाने दमदार हजेरी लावली. दरम्यान तालुक्यातील पाथरे शिवारात कापूस वेचणी करणाऱ्या टोळीतील दोन शेतमजुरांवर वीज कोसळल्याची घटना घडली आहे.
यात शेतमजुरांवर गंभीर इजा झाली असून दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील पाथरे शिवारात ज्ञानेश्वर आप्पासाहेब जाधव या शेतकर्याच्या शेतात बारा शेतमजुर कापूस वेचणी करत होते.
दरम्यान शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पाऊस आल्यानंतर बारा शेतमजूर भोकराच्या झाडाखाली बसले असता शब्बीरभाई जानूभाई पठाण व हिराबाई रामदास बाचकर या दोघांच्या अंगावर वीज कोसळली.
यात शब्बीरभाई जानूभाई पठाण यांच्या पाठीला व पायाला गंभीर जखमा झाल्या तर हिराबाईच्या अंगावर लोळ उडाल्याने त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना श्रीरामपूर येथे एका रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील विविध भागात जोरदार पाऊस पडत आहे. त्यात पाथर्डी व नगर तालुक्यात वीज कोसळून जनावरे मृत्युमुखी पडले होते. त्यामुळे नागरिकांना या काळात अधिक काळजी घ्यावी असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.