अहमदनगर Live24 टीम,13 जुलै 2020 : हॉटेलचे गोदाम फोडून चोरी केल्याप्रकरणी पोलिसांनी तीन चोरट्यांना जेरबंद केले आहे.
पोलिसांनी या चोरट्यांकडून २ लाख ५० हजार रुपये किंमतीची पिकअप, ५० आणि ३० हजार रुपये किंमतीच्या दोन दुचाकी असा एकूण ३ लाख ३० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
संगमनेर तालुक्यातल्या निमगावजाळी शिवारात असलेल्या लोणी -संगमनेर रस्त्यालगतच्या हॉटेल गोविंदमध्ये रविवारी रात्री हा प्रकार घडला होता. चोरीला विरोध करण्यास गेलेल्या हॉटेल कामगाराला चोरट्यांनी जखमी केले.
माहिती मिळताच पोलिसांनी पाठलाग करून तीन चोरट्यांना ताब्यात घेतले. तर सहा चोरटे मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले. याप्रकरणी लखन उर्फ लक्ष्मण संपत खरात यांनी आश्वी पोलीस ठाण्यात दाखल फिर्याद दिली.
यात म्हटले आहे, की रविवारी रात्री दि. १२ च्या सुमारास हॉटेल गोविंदमध्ये कामगारांना जेवण बनवण्याचे काम सुरू होते. त्यावेळी हॉटेलच्या मागे असलेल्या गोदामामधून आवाज आला.
त्यामुळे कामगार मोहित पंडित याला काय झाले ते पाहण्यासाठी पाठवले. पाठीमागे गेलेला मोहित पंडित हा धावत आला आणि गोदामाच्या खिडकीचे ग्रिल आणि दरवाजाचे कुलूप तोडून सहा जण चोरी करत असताना त्यांना हटकले असता
माझ्या हातावर कटावणी मारली. त्यामुळे लक्ष्मण मंडल, अरबाज खान, मोहित पंडितसह गोदामकडे गेलो आणि हॉटेलचे मालक संतोष डेंगळे यांना फोनवरून चोरीची माहिती दिली.
यानंतर संतोष डेंगळे आणि शेखर डेंगळे हे हॉटेलवर आल्यानंतर बॅटरीच्या उजेडात अरगडे यांच्या शेतात चोरट्यांचा शोध घेत असताना आश्वी पोलिसांना कळविले.
यावेळी गस्तीवर असलेल्या पोलीस नाईक शांताराम झोडगे, हवालदार प्रविण दैनिमाळ, होमगार्ड अर्जुन देवकर व माजी सैनिक सुनील गायकवाड यांनी चिंचपूर शिवारात अस्मिता डेअरी जवळ तिघांना पकडले.
पकडलेल्या चोरट्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून अन्य सहा सहकारी पळून गेल्याचे सांगितले. दरम्यान, यावेळी निमगावजाळीचे पोलीस पाटील दिलीप डेंगळे, ग्रामरक्षक दलाचे गौरव बिडवे,
बाबासाहेब डेंगळे आणि पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर, हवालदार विनोद गंभिरे, अमर दांडगे घटनास्थळी आले. त्यांनी चौकशी केली असता त्या तिघांनी मुजाफ्फर बाबाशहा सय्यद,
सचिन केशव जोशी (दोघे रा. बेलापूर खुर्द, ता. श्रीरामपूर) आणि अरबाज जहिर बेग (रा. सुभेदार गल्ली, वार्ड नं – 2, ता. श्रीरामपूर) अशी नावे सांगितली.
तर त्यांच्याकडील दोन दुचाकी आणि एक पिकअप वाहनासह त्यांना आश्वी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. आरोपींनी सांगितले, की त्यांच्याबरोबर असलेला
सुलतान शेख आणि अरिफ शेख (दोघे रा. बेलापूर खुर्द, ता. श्रीरामपूर), आवेज उर्फ बाबा शेख (रा. रामगड, ता. श्रीरामपूर), शाहरुख शहा, अरिफ शेख (रा. वॉर्ड नं -2 श्रीरामपूर) व एक अनोळखी व्यक्ती पळून गेल्याचे सांगितले.
यावेळी हॉटेलमधून ३ हजार ८४० रुपये किमंतीची इंग्लिश दारू चोरीला गेली असल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. याप्रकरणी नऊ जणाविरुध्द आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा भारतीय दंड संहिता 395, 397 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
या चोरीचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नयन पाटील आणि त्यांचे सहकारी करत आहेत.
दरम्यान, चौथा आरोपी अरिफ अल्ताफ शेख (रा. बेलापूर, ता. श्रीरामपूर) यांच्या मुसक्या आवळत ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews