Ahmednagar News : शासनातर्फे शंभर टक्के अनुदानावर वैरण, बियाणे वितरित करण्यात येत असून, परिसरातील शेतकऱ्यांनी बेलपिंपळगाव (ता. नेवासा) येथील पशुवैद्यकीय केंद्रात मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहायक पशुधन विकास अधिकारी डॉ. कैलास नजन यांनी केले आहे.
मागील वर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याच्या शक्यतेने चाराटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात चारा मागणीची शक्यता लक्षात घेऊन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी चाराटंचाईबाबत संबंधित विभागाला उपाययोजना करण्याबाबत सूचित केले होते.
सन २०२३-२४ या वर्षासाठी वैरण, चाऱ्यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्याकडे स्वतःची शेतजमीन व सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे,
अशा शेतकऱ्यांची निवड केली जाणार आहे. बेलपिंपळगाव, पाचेगाव, पुनतगाव परिसरातील शेतकऱ्यांनी आपले अर्ज १५ फेब्रुवारी ते २९ फेब्रुवारीपर्यंत सादर करावेत, असे आवाहन डॉ. नजन यांनी केले आहे.