Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील मुंगी शिवारातील भाऊसाहेब अर्जुन भुजबळ यांच्या तीन एकरपैकी अर्ध्या क्षेत्रातील झाडावरील मोसंबीची फळे गळून पडल्याने भुजबळ यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
भुजबळ यांची पैठण उजवा कालव्यालगत साडेतीन एकर जमीन असून, त्यामध्ये तीन एकरावर मोसंबीचे ४५० झाडे लावलेली आहेत. या झाडांना फळेही जोमाने लागली होती. मात्र, खरेदीसाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांकडून योग्य भाव मिळत नसल्याने फळे तोडण्यास विलंब झाला,
त्यामुळे फळे आपोआप गळून पडली आहेत. याबाबत भुजबळ यांनी सांगितले की, येणारे व्यापारी भाव पाडून मागत असल्याने मी नकार दिला तसेच मागील वर्षी ४ हजार ५०० रुपये फळबाग पीकविमा भरला होता. मात्र, त्या विम्याची रक्कम भेटलीच नसल्याने चालू हंगामात मी पीक विमा भरला नाही.
या फळबागेची मुंगी गावचे कृषी सहाय्यक सुभाष बारगजे यांनी पाहणी केली आहे. या वेळी बारगजे म्हणाले की, झाडाला आलेली फळे वेळेत तुटणे गरजेचे होते. मात्र, ते न तुटल्याने फळे आपोआप गळून पडलली आहेत. केवळ फळ तोडणीच्या काळात भाव नसल्याने भुजबळ यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.