Ahmednagar News : राहुरी- सोनई- शिंगणापुर रस्त्यावर पिपरी अवघड येथील सोनई करजगांवसह १६ गाव पाणी पुरवठा योजनेची पिण्याची पाईप लाईन अनेक दिवसापासून सडलेली आहे. ती वारंवार लिकेज होत असल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
याबाबत अनेक तक्रारी करून सुद्धा त्याकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे नुकसानीचे आम्हाला ५ लाख रुपये नुकसान भरपाई मिळावे, पाईप लाईनचे लिकेज लवकरात लवकर दुरुस्त करावे अशी मागणी येथील शेतकरी सुभाष सीताराम गुलदगड व शेतकऱ्यांनी केली आहे.
पिंप्री अवघड येथील शेतकऱ्यांच्या जमिनीतून सोनई करजगावसह १६ गावांची पिण्याच्या पाणी योजनेची पाईप लाईन जाते. सदर पाईप लाईन अनेक ठिकाणी सडलेली असून दोन वर्षापासून सतत लिक होत आहे.
या लिकेजमुळे सन २०२१ मध्ये गुलदगड यांचा तीन एकरातील ऊस संपूर्णपणे खराब झाला होता. हा ऊस बाहेर काढणेसाठी तसेच चालू हंगामात कपाशी पीक घेता आले नाही. आताही गव्हाचे पिक घेण्याची शक्यता नाही.
जेसीबीच्या सतत वापरामुळे सतत जमिनीची लेव्हल करणे, नांगरणे यासाठी मशागत खर्चही वाढला. हा संपूर्ण खर्च, पिक घेता न आल्यामुळे सुमारे ५ लाख रूपायाचे नुकसान झाले आहे. ही भरपाई मिळावी.
ही पाईप लाईन तात्काळ दुरूस्त व्हावी अन्यथा आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय नाही. असा इशारा सुभाष गुलदगड, बाळासाहेब गुलदगड, मच्छिद्र गुलदगड, राजेंद्र गुलदगड, सुनिल गुलदगड यांनी केली आहे.