अहमदनगर बातम्या

पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांचे कांदा पिकाचे नुकसान

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑक्टोबर 2021 :-  गेले तीन दिवस परतीच्या मोसमी पावसाने तालुक्यात धुमाकूळ घातला आहे. अतिवृष्टीमुळे कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

कृषी विभागाकडील नोंदीनुसार तालुक्यात ७ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड झाली आहे. त्यापैकी सुमारे २५ ते ३० टक्के, अडीच हजार हेक्टर क्षेत्रावरील कांदा पीक नष्ट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

कांदा पिकासह ऊस, मका, सोयाबीन, फळबागांचे मोठे नुकसान झाले. महसूल, कृषी विभागाने पावसामुळे झालेल्या शेतीमालाचे तातडीने पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.

दरम्यान आमदार नीलेश लंके यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना पत्र पाठवून पावसामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.

खरीप हंगामात पावसाने ओढ दिल्याने तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून तालुक्याच्या विविध भागात कमी पाऊस झाला.

परतीच्या मोसमी पावसाने मात्र पिकांचे अतोनात नुकसान झाले. तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ऐन काढणीस आलेल्या सोयाबीनचे नुकसान झाले.

गेल्या दीड महिन्यांपासून तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड सुरू होती. कांदा पिकाचे व कांदा रोपांचे नुकसान झाले..

Ahmednagarlive24 Office