Ahmednagar News : लव्ह जिहाद प्रकरणातून सक्तीने धर्मांतर घडवून मढी येथील तरुणीला फूस लावून पळून नेत विवाह लावण्याचा प्रकार लक्षात येताच मढीसह परीसरात तणाव पसरून सर्वपक्षीय ग्रामस्थ व विविध हिंदुत्ववादी संघटनांनी पोलिस स्टेशनवर मोर्चा काढून पोलिसांना निवेदन दिले. मुलगी परत द्या, अथवा परिणामांना तयार राहा. असा इशारा देत ग्रामस्थांनी मढी गाव बंद ठेवले.
याबाबत अधिक माहिती अशी, शुक्रवारी रात्री मढी येथून तरुणीला दुसऱ्या समाजातील एका तरुणाने प्रेम प्रकरणातून फूस लावून पळून नेले. तिला त्यांच्या समाजातील नाव देऊन लग्न लावले. दोन दिवसांनी हे जोडपे पोलीस स्टेशनला हजर झाल्यावर ग्रामस्थांना खरा प्रकार कळाला.
ग्रामस्थ, नातेवाईक, कुटुंबीय सर्वांनी पोलिस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण तणावग्रस्त मनस्थितीतील मुलगी ऐकण्याच्या तयारीत नसल्याने पोलिसांनी तिची रवानगी महिला सुधारगृहात केली. घटनेच्या दुसऱ्या दिवशी रात्री अशाच अन्य एका मुलीला फूस लावून पळवण्याचा प्रकार ग्रामस्थांच्या आक्रमकतेमुळे थांबून चांदबिबी महालाच्या परिसरातून मुलगी परत आली.
ग्रामस्थांनी अन्य मार्गाने चौकशी केली असता अन्य काही मुलींचे आधार कार्ड संशयास्पदरित्या बदलण्यात आल्याची माहिती सरपंच संजय मरकड व अन्य ग्रामस्थांना समजली. या घटनेची माहिती पंचक्रोशीतील निवडुंगे, घाटशिरस तिसगाव, पारेवाडी, मांडवा शिरापूर, धामणगाव अशा गावांना कळून संपूर्ण परिसर संतप्त झाला.
भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष विद्या गाडेकर यांनी व इतर संघटनाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी रात्री कुटूंबीयांची भेट घेऊन ग्रामस्थांकडून माहिती घेतली असता अनेक गंभीर प्रकार पुढे आले. बुधवारी सकाळी ग्रामस्थ, सकल हिंदू समाज व अन्य संघटनाच्या पुढाकाराने मढी येथे ग्रामसभा घेतली. यामध्ये विविध ग्रामस्थांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया नोंदवून आक्रमकपणे उत्तर देण्याचे धोरण ठरवण्याचा आग्रह धरला.
हिंदूंच्या आया बहिणी सुरक्षित नसेल तर आपण बांगड्या भरल्या नाहीत, धर्मांतराचा अत्यंत गंभीर प्रकार तालुक्यात होऊनही प्रशासन स्वस्थ आहे. देवस्थानच्या इनामी जमिनी देवस्थान समितीकडे अथवा ग्रामपंचायतिकडे वर्ग करून घ्याव्यात संबंधित लोकांविरुद्ध आर्थिक देवाणघेवाण बंद करावी. सक्तीने धर्मांतर करून तरुणीला काहीतरी प्रकाराने भ्रमित केले आहे.
या प्रकाराची सखोल चौकशी व्हावी. तिसगाव येथे कार्यक्षम पोलीसासह वाढीव कर्मचारी कायमस्वरूपी नियुक्त करावेत. रोड रोमिओचा बंदोबस्त करावा. शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या वेळात मढी, मांडवा, देवराई, शिरापूर आदी रस्त्यावर पोलीस नेमून हायस्कूल चौकातील रोमिओगिरी बंद करावी यासाठी आंदोलन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.
दुपारी पोलीस स्टेशनमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाबरोबर चर्चा करून माहिती घेतली. यावेळी सरपंच संजय मरकड, माजी सरपंच भगवान मरकड, देविदास मरकड, सुभाष मरकड, दीपक महाराज काळे, विश्व हिंदू परिषदेचे पप्पू पालवे आदी उपस्थित होते.