Ahmednagar News : जिल्ह्यात लंपीचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासकीय स्तरावर उपाय योजना करूनही लंपी नियंत्रणात आलेला नाही. त्यामुळे लोकसहभागातून लंपी नियंत्रणासाठी पशुसंवर्धन विभागाने पशुपालकांना गोठा स्वच्छता,
माशी नियंत्रण व बाधित जनावरांचे विलगीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत ७९९ बाधित जनावरांवर उपचार सुरू आहे.
जनावरांमध्ये आढळून येणाऱ्या त्वचेच्या लंपी रोगाचा फैलाव झपाट्याने सुरू आहे. दररोज सरासरी ४० जनावरांना बाधा होत आहे. महिनाभरात बाधीत झालेल्या १ हजार ९७४ जनावरांपैकी १ हजार ६१७ जनावरे उपचारानंतर बरी झाली आहेत.
लंपी रोगाचा फैलाव एका जनावरापासून दुसऱ्या जनावराला होतो. तसेच बाधीत जनावरांचे पशुपालक इतर निरोगी जनावरांच्या संपर्कात आल्यासही फैलाव होऊ शकतो. त्यासाठी बाधीत क्षेत्रातील विषाणुचे प्रमाण कमी करण्यासाठी उपचाराबरोबरच जनावरांचे विलगीकरण, गोचीड, माशा नियंत्रणासाठी औषध फवारणी करणे गरजेची आहे,
अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन विभागा प्रसासनाने दिली. प्रशासनाने आतापर्यंत सुमारे १४ लाख जनावरांचे लसीकरण केले आहे, तसेच नव्याने जन्माला येणाऱ्या वासरांचेही लसीकरण करण्याचे आवाहन केले आहे.
या रोगात मृत्युदर ४.९७ टक्क्यावर आहे. लंपों बाधितचा आकडा वाढत असला तरी दुध उत्पादनावर अद्याप फारसा परिणाम झाला नसल्याचे दिसून आले आहे. परंतु,या रोगात जनावरांचा मृत्यु होत असल्याने चिंता वाढली आहे. सद्यस्थितीत २५ लंपी बाधित जनावरांची प्रकृती गंभीर आहे.
गोचीड नाशक फवारणीसाठीची औषधे पशुपालकाला वाटप केली जातात. जनावरांच्या अंगावर फवारणीसाठी सायफर मेथ्रीन, डेल्टा मेथ्रीन या औषधाचा वापर केला जातो. तर ग्रामपंचायतींना गोठ्याच्या निर्जंतुकीकरणासाठी सोडियम हाईपोक्लोराईट फॉगिंगचे निर्देश दिले आहेत. डॉ. सुनील तुंबारे, उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग.