१३ मार्च २०२५ श्रीरामपूर : हरेगावमध्ये झालेल्या शुभम माघाडे याच्या अपघाताच्या घटनेची चौकशी नक्कीच करावी पण जाणूनबुजून कट करून गलांडे कुटुंबातील सदस्यांना हेतुपूर्वक बदनाम करू नका,अशी मागणी मराठा समाजाने केली.या प्रकरणाबद्दल जिल्हा पोलिस प्रमुख राकेश ओला यांना निवेदन दिले गेले आहे.
हरेगावच्या रस्त्यावर शुभम माघाडे या तरुणाचा काही दिवसांपूर्वी अपघातात मृत्यू झाला होता. माघाडे हा हरेगाव येथील अॅट्रोसिटीच्या गुन्ह्यातील फिर्यादी आहे. त्यामुळे माघाडे याचा अचानक झालेला अपघात आणि मृत्यू यावर रिपाइं, तसेच भीमशक्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संशय व्यक्त केला होता.तसेच हा घातपात जाणूनबुजून केला असेल असा संशय व्यक्त केला जात आहे.या अपघाताची सखोल चौकशीची मागणी करून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

या गोष्टीला मराठा समाजाच्या वतीने काही कार्यकर्त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.बुधवारी त्यांनी जिल्हा पोलिस प्रमुखांना निवेदन दिले.त्या निवेदनावर सुरेश कांगुणे, अमोल बोंबले, प्रदीप जाधव, जयसिंग पवार, दिलीप गलांडे, श्रीकांत कदम, दत्तात्रय कदम, शिवाजी शिंदे, भगवान ताके, राजेंद्र गिर्हे आदींनी सह्या केल्या आहेत.
या अपघाताच्या घटनेतून दोन समाजात जातीय तेढ निर्माण केली जात असून हेतुपूर्वक केले जात असून यामागे राजकारण होत असल्याचे दिसत आहे.अशा प्रवृत्तीच्या लोकांना जिल्ह्यातून तडीपार करून त्यांना हरेगावमध्ये बंदी घालण्यात यावी नाहीतर मराठा समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे.
माघाडे याच्या अपघाताला हेतुपूर्वक जातीय आणि राजकीय वळण दिले जात असून त्यात गलांडे कुटुंबीयांना अडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. हरेगाव येथील अॅट्रॉसिटी प्रकरणाला न्याय मिळायलाच पाहिजे पण त्याद्वारे गलांडे कुटुंबीयांना वेठीस धरले जात आहे. हरेगाव, तसेच उंदिरगाव येथे सामाजिक सलोख्याचे वातावरण आहे.