‘शरद पवारांच्या ‘पुलोद’ प्रयोगानंतरच महाराष्ट्राचे राजकारण घातक वळणावर’; विखेंच्या आत्मचरित्रात गौप्यस्फोट

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- दिवंगत माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे यांच्या आत्मचरित्राचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्रकाशन झालं. या आत्मचरित्रात बाळासाहेब विखेंनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत.

त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. शरद पवार पुरोगामी लोकशाही दलाच्या माध्यमातून मुख्यमंत्री झाले, मात्र त्यानंतर राजकारणाला खूप घातक वळण लागलं. पवारांमुळे सत्तेसाठी आणि सत्तेपुरतं राजकारण करण्याची सुरुवात झाली,

असा घणाघाती आरोप बाळासाहेब विखे यांनी आपल्या आत्मचरित्रात केला आहे. राज्यात फोफावलेल्या घातक राजकाणावरून पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांनी आपल्या आत्मचरित्रात ‘पुलोद’ प्रयोगावर आणि पर्यायाने राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राजकीय भुमिकेवर बोट ठेवले आहे.

त्यांनी पवारांच्या क्षमतांबाबत कौतुकाची शब्दमांडणी केली. मात्र सोबतच पवारांचा स्वभाव, वागणं आणि राजकारणाने क्षमतांवर पाणी फिरविल्याचेही म्हटले आहे. पद्मभूषण स्व.बाळासाहेब विखे पाटील यांचे ‘देह वेचावा कारणी’ हे आत्मचरित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीने मंगळवारी प्रकाशित झाले.

अपेक्षेनुसार त्यांनी राजकीय जीवनातील प्रवेश, काँग्रेस, फोरम, इंदिरा गांधी, राजीव गांधी, पुलोद, शरद पवार, 1991 ची लोकसभा, शिवसेना आणि भाजप अशा सर्व विषयांचा सविस्तर पदर उलगडला आहे. सद्य राजकारणात महत्त्वाची भुमिका असलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा काही राजकीय प्रसंगामध्ये त्यांनी खुबीने आणि सूचक वापर केला आहे.

पवार यांच्या पुलोद सरकारचा उल्लेख करताना त्यांच्या राजकीय स्वभावावरही भाष्य केले आहे. आत्मचरित्रात ते म्हणतात, ‘पवारांनी ‘पुलोद’चा प्रयोग करून मुख्यमंत्रीपद मिळवलं खरं. पण त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाने सर्वार्थानं घातक वळण घेतलं. पक्षापेक्षा व्यक्तीगत राजकीय बळ आणि महत्त्वाकांक्षेला महत्त्व आलं.

सत्तेसाठी व सत्तेपुरतं राजकारण करण्याची नवीन परंपरा महाराष्ट्रात सुरू झाली. ‘सत्तेसाठी सर्व काही’ हा नवा मंत्र महाराष्ट्राच्या राजकारणात रूजला. यात त्यांनी काँग्रेसचा कमकुवतपणा किंवा काँग्रेसची संघटनात्मक कमजोरी याबद्दल सखोल विचार करण्याची गरज आहे.

आहे त्याच मार्गाने गेल्यास काँग्रेसचं कसं होणार? असा प्रश्नही ते उपस्थित करतात. जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या राजकीय घटनांचीही त्यांनी आपल्या शैलीत मांडणी केली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24