अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :- आद्यसमाज सुधारक महात्मा ज्योतीराव फुले यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे, यासाठी पक्षाचे नेते प्रदेशाध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात यांनी पुढाकार घेऊन केंद्र सरकारला प्रस्ताव द्यावा. ना. थोरात यांना शहर काँग्रेसचे शिष्टमंडळ भेटणार आहे, अशी माहिती पक्षाचे शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी दिली.
म.फुले यांचा आज शनिवारी 130 वा स्मृतीदिनानिमित्त शहर काँग्रेसच्यावतीने आयोजित कार्यक्रमात सागर चाबुकस्वार यांनी महात्मा फुले यांना भारतरत्न द्यावा, असा ठराव मांडला. ठरावाला शहर उपाध्यक्ष शशिकांत पवार यांनी अनुमोदन दिले.
सावित्रीबाई फुले यांचे प्राथमिक शिक्षण नगरच्या क्लेरा ब्रुस शाळेत झाल्याची माहिती अॅड.पिल्ले यांनी यावेळी दिली. या शाळेत सावित्रीबाई फुले यांचे स्मारक करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली.
भिंगार काँग्रेसचे अध्यक्ष अॅड.आर.आर.पिल्ले यांच्या अध्यक्षतेखाली या सोहळ्यात श्री.चाबुकस्वार आणि संतोष धीवर यांचे महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर व्याख्यान झाले. महात्मा फुले यांनी समाज परिवर्तन करुन समाजातल्या दीन-दुबळ्यांचे प्रतिनिधित्व केले. महात्मा फुलेंचे परिश्रम समाज प्रबोधनासाठी होते.
त्यामुळे समाजात परिवर्तन झाले, असे वक्त्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला. याप्रसंगी सुभाष रणदिवे, शशिकांत पवार, परवेझ झकेरिया, महिलाध्यक्ष मार्गारेट जाधव, एम.आय.शेख, मुकुंद लखापती, रजनी ताठे, रवी सूर्यवंशी, अॅड.नरेंद्र भिंगारदिवे आदि उपस्थित होते.
कार्यक्रमात महात्मा फुले यांच्या जीवनावरील सुनिल महाजन यांनी केलेली कविता दिनेश येवले यांनी सादर केली. सूत्रसंचालन पत्रकार राजेश सटाणकर यांनी केले तर शेवटी आभार शामराव वाघस्कर यांनी मानले. यावेळी महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा निर्मला गायकवाड यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved