अहमदनगर बातम्या

राहाता बाजार समितीसमोर महाविकास आघाडीचा रास्तारोको

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : कांद्यावरील निर्यात बंदी मागे घेऊन निर्यात तात्काळ सुरू करावी, भाव पडल्याने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने अनुदान द्यावे,

सोयाबीन व अन्य शेतमालाची आयात बंद करून निर्यातीस कोणतेही प्रतिबंध घालू नये, सर्व पिकांचे हमीभाव खरेदी केंद्र त्वरित सुरू करावे,

या मागण्यांसाठी राहाता तालुका शेतकरी, महाविकास आघाडी, काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व शेतकरी संघटना यांच्यातर्फे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

राहाता तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर शेतकऱ्यांनी शुक्रवार सकाळी १० वाजता आंदोलन सुरू केले होते. यावेळी बाजार समितीच्या सचिवांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे, की केंद्रातील भाजप व राज्यातील महायुतीचे सरकार यांच्या गलथान कारभार व चुकीच्या शेतकरी धोरणांमुळे दिवसेंदिवस दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडत आहे. शेतकऱ्याचे जगणेच मुश्किल झाले आहे.

केंद्रात भाजप सरकार आल्यापासून ते सातत्याने शेतमालावर अव्वाच्या संव्वा निर्यात शुल्क लावणे, निर्यात बंदी करणे, यासारखे शेतकऱ्यांची पिळवणूक करणारे आदेश काढत आहे. या आधी कांद्यावर ४० टक्के निर्यात कर लावले व नंतर सरसकट कांदा निर्यात बंदी केली.

हा केंद्र सरकारचा निर्णय शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिघडत चालली आहे.

केंद्र सरकारने सोयाबीन व अन्य पिकांच्या बाबतीतही अशाच प्रकारचे शेतकऱ्यांची आर्थिक नुकसान होईल, असे चुकीचे निर्णय घेतले आहे. त्यामुळे शेतकरी दिवसेंदिवस आर्थिक संकटात सापडला आहे.

याप्रसंगी प्रतिभाताई घोगरे, काँग्रेसचे शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौगुले, काँग्रेसचे श्रीकांत मापारी, संजय पगारे, शशिकांत लोळगे, नितीन सदाफळ यांची भाषणे झाली.

यावेळी केंद्र सरकार व राज्य सरकारचा निषेध नोंदवत आंदोलनकर्त्यांनी लोकप्रतिनिधींच्या पोस्टरवर कांदे ओतून निषेध नोंदवला. आसिफ इनामदार, अनिस शेख, निलेश डांगे, शिवप्रकाश आहेर, निलेश कार्ले, अनिल गुंजाळ,

संपत हिंगे आदी कार्यकर्ते तसेच शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या शेतकरी मागणीचे निवेदन बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी स्वीकारल्यानंतर शेतकऱ्यांच्या व महाविकास आघाडीच्या वतीने घेऊन केलेले आंदोलन स्थगित करण्यात आले.

Ahmednagarlive24 Office