अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :-केटीवेअरच्या पाण्यात दोन सख्या भावांचे व त्याच्या मामाचाही बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान हि घटना संगमनेर तालुक्यातील झोळे येथे गणेशवाडी येथे घडली असल्याचे समजते आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, सुरज संतोष गाढवे (वय १५) व मयूर संतोष गाढवे (वय १३) हे दोघे भाऊ आपले सख्खे मामा संजय भाऊसाहेब खर्डे (वय ४० रा. गणेशवाडी झोळे) यांच्याकडे आले होते.
दरम्यान रविवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास शेळ्या चरण्यासाठी गणेशवाडी परिसरात गेले होते. त्या परिसरात पावसाच्या पाण्याने भरलेल्या केटीमधील पाण्यात शेळ्या धुण्याचे काम सुरु होते.
त्यावेळी मयूर व सुरज यांना पाण्याचा अंदाज न आल्याने हे दोघे भाऊ पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले. हे पाहून मामा दोन्ही भाच्यांना वाचविण्यासाठी गेले असता मामा व भाच्यांना पोहता येत नसल्याने तिघांचाही पाण्यात मृत्यू झाला.
यावेळी परिसरातील नागरिकांना माहिती समजताच त्यांना वाचविण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. या तिघांना पाण्यातून बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात आणण्यात आले.
त्यानंतर तिघांचे मृतदेह शवविचेदनासाठी संगमनेर कुटीर रुग्णालयात आणण्यात आले. भाऊसाहेब कारभारी खर्डे यांनी तालुका पोलिसांत फिर्याद दिली असून यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.