Ahilyanagar Crime News : मिळालेले पैसे पत्नीला दिले नाहीत, या कारणावरून राहुरी तालुक्यातील मानोरी येथे ७ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास किरण कारभारी मकासरे (वय ३०) यांना सासरच्या लोकांनी शिवीगाळ करत लोखंडी टामी, लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
किरण मकासरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांनी ७ जानेवारी रोजी त्यांची जरशी गाय एका व्यापाऱ्याला ४१ हजार विकला होती; मात्र हे पैसे पत्नीला न दिल्यामुळे पत्नीने आपल्या माहेरच्या लोकांना ९ जानेवारी रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास बोलावून घेतले. यानंतर सासरे किरण महादू कांबळे, सासू ज्योती कांबळे, मेव्हणा विकी कांबळे, मेव्हणी स्विटी कांबळे आणि पत्नी प्रिया मकासरे हे सर्वजण मानोरी येथे किरण मकासरे यांच्या घरी आले.
घरी आल्यावर त्यांनी “तू गाय विकून मिळालेले पैसे माझ्या मुलीला का दिले नाहीस ? ते पैसे लगेच दे!” असे म्हणत किरण मकासरे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यानंतर लोखंडी टामी, लाथा आणि बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. आरोपींनी यावेळी खिशातील ४१ हजार रुपये आणि मोबाईल काढून घेतले. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली.
प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यांच्या तक्रारीवरून पत्नी, सासरे किरण कांबळे, सासू, मेव्हणा विकी कांबळे, मेव्हणी (सर्व राहणार, वॉर्ड नं. १, गोंधवणे, ता. राहुरी) आणि तीन ते चार अनोळखी व्यक्ती यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींवर भारतीय दंड विधान कलम ३५२, ३५१(२), १९१(३), १९१(१), १८९(२), ११९(१), ११८ (१), ११५ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास राहुरी पोलीस करीत आहेत.