भुरळ पाडून दीड तोळ्याचे मंगळसूत्र लांबविले !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :- राहुरी शहरातील शुक्लेश्वर चौक येथे एका महिलेला भुरळ पाडून दोन अज्ञात भामट्यांनी सुमारे दीड तोळा वजनाचे मंगळसूत्र घेऊन पोबारा केला.

ही घटना काल दि. २० जानेवारी रोजी दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरातील चांगलीच खळबळ उडाली. धनश्री धनंजय पुरोहित या पती धनंजय पुरोहित व आपल्या कुटूंबासह राहुरी शहरातील शुक्लेश्वर चौक येथील शुक्लेश्वर मंदिरात राहातात. दि.२० जानेवारी रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास त्या घरी एकट्याच होत्या.

यावेळी मंदिरात दोन अज्ञात तरूण दर्शन घेण्यासाठी आले. दर्शन घेऊन ते पुजा करण्यासाठी बसले. यावेळी त्या भामट्यांनी धनश्री पुरोहित यांना सांगितले की, आम्हाला देवाची पुजा करून दान करायचे आहे. तुम्ही तूमचे मंगळसूत्र येथे ठेवा. यावेळी पुरोहित यांना काहीच समजले नाही.

त्यांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे ७५ हजार रुपये किंमतीचे दिड तोळा वजनाचे मनी मंगळसूत्र काढून दिले. त्या भामट्यांनी धनश्री पुरोहित यांचे मंगळसूत्र व त्यांच्या जवळील काही रोख रक्कम दोन्ही एकत्र करून एका पिशवीत घालून गणपतीच्या मूर्तीसमोर ठेवले आणि पुजा सुरू केली. काही वेळातच भामटे तेथून पसार झाले.

धनश्री यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी देवासमोर ठेवलेली पिशवी तपासून पाहिली तर त्यातील मंगळसूत्र व त्या भामट्यांनी ठेवलेले रुपये गायब झाले होते. मंगळसूत्र व पैशाच्या जागेवर दोन बिस्कीट पुडे, एक अगरबत्ती पूडा आणि काही दगडाचे दोन खडे आढळून आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी ही घटना पती धनंजय पुरोहित यांना सांगितली.

धनंजय पुरोहित व त्यांची पत्नी धनश्री यांनी नवीपेठ व बस स्थानक परिसरात त्या भामट्यांचा शोध घेतला; मात्र ते भामटे पसार झाले होते. धनश्री पुरोहित यांनी राहुरी पोलिसात धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला. या घटनेबाबत उशीरापयंर्त गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

अहमदनगर लाईव्ह 24