मराठा समाजाचा ओबीसीत समावेश नको

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- मराठा समाजाला आरक्षण देतांना ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये आणि मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करु नये, अशी मागणी ओबीसीचे नेते व जय भगवान महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी केली.

राज्याचे ओबीसी कल्याणमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत ओबीसी,व्हीजे, एनटी जनमोर्चाच्यावतीने शनिवारी (दि.26) नगर शहरात मेळावा होणार आहे. या मेळाव्याच्या नियोजनासाठी संघटनेचे राज्य नेते श्री.सानप कालच्या नियोजनाच्या बैठकीला उपस्थित होते.

नक्षत्र लॉन येथे झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी महापौर भगवान फुलसौंदर होते. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यास ओबीसीचा विरोध नाही. पण, ओबीसीत त्यांचा समावेश नको असे सांगून सानप पुढे म्हणाले. असे झाल्यास 382 जातीचा समुह म्हणजे पूर्ण ओबीसी समाज कायमचा वंचित राहील.

ओबीसीचे दुसरे नेते लक्ष्मण हाके यांनी सद्यस्थिती, सरकार निर्णय आणि ओबीसी समाजावरील अन्यायाचे सविस्तर विश्‍लेषण केले. एकूण लोकसंख्येत ओबीसी 52 टक्के संख्येने असून, आजही ते उपेक्षित आहे. त्यात मराठा समाजाचा समावेश होतो का? या भितीने ओबीसी आता जागा झाला आहे. त्याला योग्य दिशा देण्याची गरज आहे.

याप्रश्‍नी राज्यात नगरसह 15 ठिकाणी मेळावा आयोजित आहे. ओबीसीची एकजूट करण्यासाठी राज्यात आम्ही कार्यरत आहे. आजच्या नियोजनाच्या बैठकीला ओबीसीतील विविध 50-55 जातेचे प्रतिनिधींचे उपस्थिती कौतुकास्पद आहे, असे राज्य सलून असोसिएशनचे अध्यक्ष सोमनाथ काशिद यांनी सांगितले.

तर नगर हे ओबीसीचे केंद्रबिंदू अशी ओळख उद्याच्या काळात निर्माण होईल, असेही ते म्हणाले. राज्याचे नेते वडेट्टीवार आणि बाळासाहेब सानप यांनी पुढाकार घेऊन ही चळवळ नव्याने उभी केली ती आरक्षण वाचविणे आणि समाजाचे 18-20 प्रलंबित असलेले ज्वलंत प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न करावयाचे आहे, त्यात आपण सहभागी झालो तरच हे शक्य आहे, असे प्रास्ताविकात रमेश सानप यांनी सांगितले.

एम.पी.एस.सी. भरती तसेच या परिक्षेला स्थगिती दिली ती उठवावी या श्री.हाके यांच्या मुद्दयाला सहमती दर्शवत जय भगवान महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद लहामगे यांनी या मुलांची वयोमर्यादा संपुष्टात आल्यास शिक्षणावरील केलेला खर्च तर वाया जाईल आणि भविष्यावर प्रश्‍नचिन्ह निर्माण होईल, हा ओबीसीवर अन्याय आहे, असे स्पष्ट केले. मुस्लिम समाजात सर्वसाधारणसह मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय आदि आहेत.

दक्षिण भारतात यानुसार 5 टक्के आरक्षण लागू आहे, असे राज्य ओबीसी शासन समिती सदस्य हाजी शौकतभाई तांबोळी यांनी सांगितले. समाजात शिक्षणाचा अभाव असल्याने आरक्षणाचा अर्थ समजावून द्यावा लागेल, असे माजी नगरसेवक अशोक दहिफळे यांनी सांगितले. चर्मकार समाज संघटीत झाला तर तो राजकीय चित्र बदलू शकता.

ओबीसीच्या सहकार्याने हेच कार्य पुढे नेले पाहिजे व समाजाला न्याय मिळावा ही भुमिका राज्य चर्मकार संघटनेचे संजय खामकर यांनी मांडली. प्रारंभी हरिभाऊ डोळसे यांनी स्वागत केले.

नगरसेवक बाळासाहेब बोराटे, राजेंद्र पडोळे, चंद्रकांत फुलारी, परवेझ शेख, सुवर्णकार संघटनेचे प्रकाश लोळगे, बारा बलुतेदार संघटनेचे माऊली गायकवाड, ट्रान्सपोर्ट संघटनेचे बाबा सानप, नगर सलून असो.चे अध्यक्ष अनिल निकम, नाभिक महिला अध्यक्षा सौ.वनिता बिडवे, गुरव समाजाच्या सौ.वनिता गुरव,

वंजारी समाजाचे बंटी डापसे, गवळी समाजाचे मिसाळ सर, माळी समाजाचे बाळासाहेब भुजबळ, बारा बलुतेदारचे कार्याध्यक्ष संजय सैंदर, सुवर्णकार संघटनेचे विशाल वालकर, निलेश पवळे, नईम शेख, अनिल इवळे, पत्रकार किरण बोरुडे, वंचित संघटनेचे प्रतिक बारसे, परेश लोखंडे,

डॉ.श्रीकांत चेमटे, दीपक कावळे, श्रीपाद वाघमारे, शाम औटी, राजेंद्र भगत, भाऊसाहेब घरवाढवे, वृत्तछााचित्रकार अमोल भांबरकर, संजय आव्हाड आदिंची समयोचित भाषणे झाली.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24