अहमदनगर Live24 टीम, 05 नोव्हेंबर 2021 :- दिवाळीनिमित्त घरांना तसेच वाहनांना फुलांचे तोरण लावण्याची परंपरा आहे. नगर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सकाळी सात वाजल्यापासूनच फुले खरेदीसाठी गर्दी झाली होती.
झेंडुला प्रकारानुसार प्रतिकिलो ७० ते १०० रुपयांचा भाव मिळाला. पूजेचे साहित्य खरेदीसाठीही मोठी झुंबड उडाली होती.
दीपावलीनिमित्त सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे, घरोघरी दारासमोर सडा, रंगीबेरंगी रांगोळी, विद्युत रोषणाईने नगर शहर उजळून निघाले.
शहरातील कापड बाजार, प्रोफेसर चाैक, चितळेरस्ता, माळीवाडा वेस परिसरात पूजेचे साहित्य विक्रीचे स्टाॅल लावण्यात आले.
या स्टाॅलवर पूजा साहित्य, तसेच नवीन कपड्यांच्या खरेदीसाठी गर्दी दिसून आली. यंदाच्या दिवाळीत इकोफ्रेंडली आकाशदिव्यांना विशेष पसंती मिळाली.
शहरात आयुर्वेद रस्ता, प्रोफेसर चाैकासह विविध भागात फुलविक्रेत्यांनी स्टाॅल लावले होते. विजयादशमीच्या तुलनेत फुलांचे दर दीपावलीला मात्र, कमी दिसून आले.
विजयादशमीला शहरी भागात झेंडू शंभरीपार तर ग्रामीण भागातही फुलांचे दर कमालीचे वाढल्याचे दिसून आले. गुरुवारी या दरांत काही अंशी घसरण दिसून आली.
झेंडू ७० ते १०० रुपये प्रतिकिलोने विकला गेला. तर शेवंता फुलांना प्रतिकिलो १६० ते २०० रुपयांचा भाव मिळाला. बहुतेक फुल विक्रेत्यांनी फुलांच्या माळा तयार करून विकणे पसंत केले.
मोटारसायकलसाठीचा हार ६० ते १०० रुपये, तर चारचाकीसाठी २०० ते ३०० रुपये दराने हारांची विक्री झाली. व्यावसायिकांनी विक्रीला मिळालेल्या प्रतिसादामुळे समाधान व्यक्त केले.