अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :- विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त करणारा पती शरद गोरख काकडे व भाया रवींद्र गोरख काकडे (दोघे रा. पारगाव वाळुंज) यांना शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
त्यांच्याविरूध्द नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. जागा घेण्यासाठी व सोन्याची अंगठी करण्यासाठी माहेरून पैसे आणावे म्हणून पती व भायाकडून सुरू असलेल्या
छळाला कंटाळून शुभांगी शरद काकडे (वय 21 रा. वाळुंज पारगाव ता. नगर) या विवाहितेने राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली होती.
वाळुंज पारगाव शिवारात गुरूवारी रात्री अडीच वाजता ही घटना घडली होती. याप्रकरणी तालुका पोलिसांनी गुरूवारी दुपारी आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली होती.
त्यांना शुक्रवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बोराडे करीत आहे.