अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :-कोरोना जाईल आणि दरवर्षीप्रमाणे दिवाळी आनंदमय साजरी होईल, या विश्वासाने कोपरगाव शहरासह तालुक्यात दिवाळीसाठी बाजारपेठ सज्ज झाली आहे. व्यापाऱ्यांनी दिवाळीसाठीचे साहित्य बाजारात दाखल केले आहे. सकारात्मक बाब म्हणजे ग्रामीण भागातील नागरिकांनी हळूहळू दिवाळीची खरेदी सुरू केली आहे.
त्यांच्या तुलनेत अद्याप शहरातील खरेदीचे प्रमाण काहीसे कमी आहे. कोरोनामुळे आर्थिक कंबरडे मोडलेली अर्थव्यवस्था हळूहळू रुळावर येत आहे. दिवाळीचा सण काही दिवसांवर आला आहे. या काळात बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड असते. मात्र, यंदा दुकानदारांवर ग्राहकांची प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे.
कोरोनामुळे अनेक महिने लॉकडाऊन राहिल्याने अत्यावश्यक सेवा सोडून इतर व्यावसायिकही आर्थिक अडचणीत आहेत. नौकऱ्या गेल्या, कर्मचारी कपात झाली, शेतमजुरांनाही काम नसल्याने आर्थिक परिस्थिती खालावली, अतिवृष्टीमुळे शेतकरूची संकटात सापडला, शाळा, कॉलेज बंद असल्याने खासगी क्लास, शिक्षण संस्थांचे उत्पन्न थांबले आहे.
याचाच परिणाम बाजारपेठवर पडला आहे. दिवाळीच्या आठ दिवस अगोदर बाजारपेठेत गर्दी असायची. मात्र, आता दिवाळी चार दिवसांवर येऊन ठेपली, तरी बाजारपेठेत शुकशुकाट आहे. सध्यातरी दुकानदार ग्राहकांची प्रतीक्षा करत आहेत.
फटाके विक्रेतेही चिंतेत :- विविध कंपन्यांचे फटाके बाजारात आले असून गेल्यावर्षीच्या तुलनेत भाव वाढले आहेत. उत्पादनही कमी झालेले आहे. केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाऊन संबंधीच्या मार्गदर्शक सूचनांना ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे अनेक निर्बंध कायम राहणार आहेत.
प्रदूषण रोखण्यासाठी सरकार आणि विविध संस्थांमर्फत केल्या जाणाऱ्या प्रचाराचाही परिणाम होऊन फटाक्यांच्या विक्रीत काही प्रमाणात घट होत असल्याचे दिसून येते. आता कोरोनानंतर आलेल्या दिवाळीत काय चित्र राहते, हे लवकरच पहायला मिळणार आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved