अहमदनगर : BPHE सोसायटी अहमदनगर संचलित अहमदनगर महाविद्यालयाच्या गणित विभागातर्फे महाविद्यालयात काल (दि.१०) भव्य गणित प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर जे बार्नबस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
महाविद्यालयाचा गणित विभाग राबवत असलेले उपक्रम आणि विभागाची ही वाटचाल कौतुकास्पद असल्याचं सांगत प्रदर्शनातील सहभागी विद्यार्थी आणि उपस्थितांना प्राचार्यांनी मार्गदर्शन केलं. प्रदर्शनातील दर्जेदार आणि विलक्षण मॉडेल आणि पोस्टर्सचे देखील त्यांनी विशेष कौतुक केले.
अहमदनगर महाविद्यालयाच्या गणित विभागाला एक उज्वल परंपरा आहे. वर्षभर गणित विषयाकडे विद्यार्थी आकर्षित व्हावेत, विद्यार्थ्यांच्या मनातून गणित विषयाची भीती काढून टाकण्याच्या दृष्टीने विभागातर्फे अनेक उपक्रम, कार्यशाळा आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवीन स्वरूपात गणित प्रदर्शन पार पडले. प्रदर्शनाच्या औपचारिक उदघाटन प्रसंगी प्राचार्य डॉ.आर जेबार्नबस, उपप्राचार्य प्रा.बी एम गायकर, रजिस्ट्रार ए वाय बळीद, गणित विभाग प्रमुख प्रा. ए ई लगड, कनिष्ठ महाविद्यालयाच्या गणित विभागाचे प्रा. पवार आणि गणित विभागातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार वाघमारे याने केले. या प्रदर्शनामध्ये Bsc आणि Msc च्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले गणितातील ३० नाविन्यपूर्ण मॉडेल्स, पोस्टर्स आणि गणिती खेळांचा समावेश होता.
दिवसभर चाललेले हे आकर्षक गणित प्रदर्शन पाहण्यासाठी अहमदनगर महाविद्यालय आणि परिसरातील शाळा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी गणित विभाग प्रमुख प्रा. लगड आणि विभागातील प्राध्यापक वर्गाने विशेष परिश्रम घेतले.