अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- संगमनेर तालुक्यात बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्यांचे सत्र सुरूच आहे. या व्यवसायावर संबंधित विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष होताना दिसत आहे. संगमनेर शहर व तालुक्यात वाळूतस्करी पुन्हा जोरदार सुरू झाली.
वाळू तस्करांची अनेक वाहने दंड न भरताच परस्पर सोडून दिली जात असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. प्रवरा, मुळा, आढळा, म्हाळुंगी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूची तस्करी सुरू आहे.
असे असतानाही संबंधित अधिकारी याकडे कानाडोळा करताना दिसत आहेत. संगमनेर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या असल्याने महसूल अधिकारी या कामात व्यस्त आहेत.
त्यामुळे वाळूतस्करीकडे त्यांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. परंतु महसूलचे काही कर्मचारी व अधिकारी वाळूतस्करांना पाठीशी घालत असल्याचे चित्र आहे.
दोन दिवसांपूर्वी जवळेकडलग येथून वाळूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला होता. मात्र ह्या ट्रॅक्टरवर कोणतीही कारवाई न करता परस्पर सोडून देण्यात आला.
हा ट्रॅक्टर सोडणार्यावर तहसीलदारांनी कारवाई का केली नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे. तहसीलदारांकडूनच कारवाई होत नसेल तर ही वाळूतस्करी कशी थांबणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.